
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : सांगली ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० च्या चौपदरीकरणाचे काम फलटण शहरातून नेण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा महामार्ग शहराबाहेरून रिंगरोडद्वारे वळवण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला देण्यात आले आहे.
महामार्गासाठी शहरात सुरू असलेल्या मोजणीमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सध्याच्या नियोजित मार्गावर अनेक निवासी इमारती, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक दुकाने आणि साखर कारखाना येत असल्याने मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या फलटण शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून, महामार्ग शहरातून गेल्यास त्यात आणखी भर पडेल. या मार्गामुळे शहरालगतच्या कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील नवीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
त्यामुळे, हा महामार्ग पूर्वी सर्वेक्षण झालेल्या मार्गाने शहराबाहेरून न्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.