दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । सातारा । सातारा जिल्हा बँकेच्या सर्वंकष आर्थिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बँकेस नाबार्डने उत्कृष्ठ कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पातळीवरील विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार देवून गौरवले आहे, असे प्रतिपादन चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याला जो कर्जपुरवठा करण्यात आला आहे तो रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड बँकेच्या निकषाच्या अधीन राहूनच करण्यात आला आहे. त्यात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही. दरवर्षीच्या ऑडिटमध्ये या गोष्टी तपासण्यात आल्या आहेत. बँकेची कर्जाबाबतची धोरणे ही सर्व साखर कारखान्यांना सारखीच लागू आहेत. ईडीने माहिती मागितली आहे. माहिती मागवणे आणि नोटीस देणे यात फरक आहे. जरंडेश्वरला केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत ईडीने मागवली आहे. त्याबाबत त्यांना योग्य ती माहिती वेळच्यवेळी पाठवत आहोत. ईडी ही केंद्र सरकारची संस्था आहे. कायदेशीर माहिती मागवली असली तरी बँकेच्या कामकाजात चुकीचे झाले नाही. काही चुकीचं झालं नाही त्यामुळे लपवण्याचं काहीही कारण नाही, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.
नाबार्डच्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त उत्कृष्ठ कामगिरी करणार्या जिल्हा बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्याचे निश्चित केले होते. याकरिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्ज पुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण कामकाज, तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकांची आर्थिक प्रगती, कर्जवितरण व कर्ज वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ठ नफा क्षमता इत्यादि निकष निश्चित केले होते. या निकषांच्या आधारावर सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) जाहिर केला आहे. या पुरस्काराचे ऑनलाईन वितरण केंद्रिय कृषिमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते दिनांक 12 जुलै 2021 रोजी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना केले. याप्रसंगी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम मार्गदर्शन यांनी केेले. याबाबतची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
याप्रसंगी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांना पुर्वीपासून बँक कर्ज पुरवठा करत आहे. सहकारी साखर कारखान्यांना बँक कर्जपुरवठा करत कारण बँकेच्या एकूण नफ्यापैकी 60 ते 65 टक्के नफा साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जापोटी होतो. इतर कर्जयोजना बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येतात त्या शुन्य टक्के दराने देण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. औद्योगिक क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यास बँकेला मर्यादा येते. त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने बँकेला चांगले ग्राहक मिळणे गरजेचे आहे जे साखर कारखान्यांच्या माध्यमातून मिळते. त्यांना कर्ज वसुलीची हमखास शाश्वती असते. जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सक्षम राहिले आहेत. याबाबत ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात संस्थांना लक्ष केले जाते असा आरोप होतो. मात्र, आपण भाजपचे आमदार असतानाही ईडीने नोटीस पाठवली या प्रश्नाला उत्तर देताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, जिल्हा बँकेची निवडणूक मी लढवली तेव्हा राष्ट्रवादीत होतो. तथापि, जिल्हा बँकेत काम करताना आम्ही राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून एकत्रपणे काम करतो. सध्या मी भाजपचा आमदार असलो तरी ईडीही राष्ट्रीय संस्था आहे. त्यामुळे हा प्रश्न भाजपा व इतर पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनाच विचारावा.
नाबार्ड पुरस्काराबाबत आ. शिवेंद्रराजे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, संचालक मंडळ व सचिव बांधव आणि जिल्हयातील साखर कारखान्यांच्या सहकार्यामुळे यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही बँकेची 97% एवढी देशात सर्वोच्च कर्ज वसुली झालेली आहे. 954 संस्थापैकी 857 संस्थांची बँक पातळीवर 100% कर्ज वसुली झालेली आहे. दि. 31/03/2021 अखेर 954 विकास सेवा संस्थापैकी 850 संस्था नफ्यात असून बँकेने 7 दशकाच्या वाटसालीमध्ये वसुली व नफ्यामध्ये सातत्य ठेवून विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यामध्ये 319 शाखा, 954 विकास सेवा संस्था, 53 एटीएम व मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा देत आहे. बँक फक्त पीक कर्ज वाटप न करता मध्यम व दीर्घ मुदत कर्ज योजनांचे माध्यमातून कर्ज वाटपात अग्रेसर राहिली आहे. बँक विकास संस्था सक्षमीकरणासाठी प्रत्येक वर्षी नफ्यातून तरतूद करते. त्यामुळे विकास संस्थांना नफ्यात येण्यास मदत होत आहे. सातारा जिल्हा बँकेच्या सर्वंकष आर्थिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बँकेस नाबार्डने उत्कृष्ठ कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पातळीवरील विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार देवून गौरवले असल्याचे ते म्हणाले.
ऑनलाईन पुरस्कार वितरण समारंभास बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.