स्थैर्य, सातारा, दि.१७: सातारा पालिकेचे अधिकारी कर्मचारी करोना प्रतिबंधाच्या निमित्ताने तब्बल सहा महिने फील्डवर आहेत . या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊ शकते हे लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचा आपत्कालीन निधी द्यावा व पालिकेच्या जुन्या इमारतीत दहा बेडचे करोना केअर सेंटर उभे करावे अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने करण्यात आली .
संघटनेचे अध्यक्ष गणेश दुबळे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले . यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे उपस्थित होते . निवेदनात नमूद आहे की पालिकेचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यापासून करोनाशी लढत आहेत . स्वच्छता करणे, घरोघरी सर्वेक्षण, कंटेट न्मेंट झोन तयार करणे, स्लीपा वाटणे विविध दाखल्यांची परवानगी अशा विविध कामांमुळे पालिका कर्मचारी लोकांच्या संपर्कात आहे .पालिकेचे अनेक कर्मचारी बाधित झाले असून शहराची सेवा करताना त्यांना वेळेवर बेड मिळत नाही . सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना खाजगी हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही . यामुळे कर्मचारी दगावण्याची शक्यता जास्त आहे . त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी पन्नास लाखाचा आपत्कालीन निधी द्यावा व जुन्या पालिका इमारतीत दहा बेडचे करोना केअर सेंटर उभारण्यात यावे अशा मागण्या फेडरेशनच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आली . गुरुवारी संघटनेचे अध्यक्ष गणेश दुबळे यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत पत्र सादर करून त्यांच्याशी चर्चा केली . कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत उच्च दर्जाचे पीपीई कीट मास्क ग्लोव्हज द्यावेत, प्रत्येक आठवडयाला कर्मचाऱ्यांची तपासणी, सफाई कामगारांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, सफाई कामगारांना मारहाण करणाऱ्या अपप्रवृत्तींना विना जामीन अटक व्हावी, सातव्या वेतन आयोगात भविष्य निर्वाह निधीचे हप्ते जमा करण्यात यावेत, डीसीपीएस कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक रोखीने मिळावा, कंत्राटी कामगारांना वरील सर्व फायदे मिळावे या सर्व मागण्यांवर दुबळे यांनी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्याशी चर्चा केली .