
दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व विविध रंगारंग कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांच्या प्रारंभी मुधोजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ध्वजारोहण फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक जीवराज दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण राष्ट्रगाण अभियानांतर्गत राष्ट्रगीत नेरकर ए. एस. व लोणकर बी. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गायले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी परेड सादर केली व ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाच्या माजी जेष्ठ विद्यार्थीनी निलीमा हेमंत दाते या उपस्थित होत्या. तसेच यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, हेमंत वसंतराव रानडे, शिरीषकुमार दोशी, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुवर्णा अमरसिंह खानविलकर, बीआरसीच्या समन्वयक कुंभार मॅडम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, तपसणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य एम. के. फडतरे, ए. वाय. ननवरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे इतर सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर शाळेतील विविध शिष्यवृत्ती परीक्षेत, विविध क्रीडा स्पर्धेत तसेच दहावी-बारावीच्या आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम लेझीम नृत्याने सुरुवात झाली व पुढे देशभक्तीपर अनेक गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले व प्रेक्षकांची दाद मिळविली. अशाप्रकारे ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या रंगारंग कार्यक्रमांची सांगता झाली.