
स्थैर्य, फलटण दि.25 : येथील फलटण सायकल असोसिएशनच्या वतीने दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ‘सायकल चालवा व आरोग्य टिकवा’ हा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. फलटणमधील वय वर्षे 18 च्या पुढील सायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर सायकल रॅलीचा शुभारंभ दि.26 जानेवारी रोजी सकाळी 6:15 वाजता फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते शहरातील डी.एड. चौक येथून होणार असून यावेळी फलटण शहरातील 85 वर्षांचे ज्येष्ठ सायकलपटू तात्यासाहेब घनवट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरची रॅली डी.एड.चौक – जिंती नाका मार्गे कमिन्स गेट व परत फिरुन डी.एड.चौक येथे येवून माळजाई परिसरात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रॅलीचा समारोप होईल.
तरी फलटणकरांनी सदरच्या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.