
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलिस भरतीत २५ टक्के आरक्षण द्यावे, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची मॅट प्रकरणातील प्रकरणे लवकरात-लवकर निकाली काढावी, यासह विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलिस बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी विविध मागण्यांसदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना संघटनेच्या वतीने निवेदन दिले. ‘‘तीस वर्षे नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली जात आहे. त्यामुळे एक जानेवारी २०१६ नंतर ३० वर्षे सेवा करून निवृत्त झालेले बांधव तीन आश्वासित योजनेंतर्गत उपनिरीक्षकपदाच्या तिसऱ्या पदोन्नतीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे सर्व लाभ मिळावेत, ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय सेवकांना एक जुलैची वेतनवाढ लागू करावी, पोलिस सेवाकाळात सलग २४ तास काम केल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, सेवानिवृत्तीनंतर सर्व आर्थिक लाभ दीड ते दोन वर्षे उशिरा मिळाल्याने त्या कालावधीचा व्याज परतावा मिळावा, सेवानिवृत्त व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना टोल माफी व्हावी, राष्ट्रपतीपदक विजेते पोलिस कर्मचाऱ्यांना एसटी, रेल्वे, विमान प्रवासात ५० ते ७५ टक्के सवलत द्यावी यासह विविध मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.