दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । मुंबई । विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बिल वसुलीसाठी कापू नये, शेतकऱ्यांची जळालेली रोहित्रे बदलून द्यावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेश किसान मोर्चाने केली आहे. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याचे मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी सांगितले.
श्री. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी स्थिती असताना शेतकऱ्यांना जळालेली रोहित्रे बदलून देताना थकीत किमान तीन बिले भरण्याची सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांना छळण्याचा हा मार्ग अतिशय संतापजनक आहे.
शेतकऱ्यांकडून वीज बिलांची पठाणी वसुली करणे वीज मंडळाने थांबवावे व शेतकऱ्यांना जळलेली रोहित्रे बदलून द्यावीत, असेही श्री. काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.