दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । लोणंद । लोणंद परिसरात मारहाण करून लुटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. टोळी प्रमुख पप्पू सर्जेराव जाधव वय २४ व संजय उर्फ दादा बारीकराव जाधव वय ३७, दोघे रा. मुळीकवाडी ता. फलटण, अजित महादेव बोडरे वय २८ व अनिल अशोक तुपे दोघे रा. तांबवे ता. फलटण आणि तुषार बाळासो पाटोळे वय २० रा. तरडगाव ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.
या पाच जणांना वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत लोणंद पोलिसांनी पोलिस अधिक्षकांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सुनावणी घेऊन अधिक्षक बंसल यांनी पाचही जणांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, भोरे व पुरंदर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.
हद्दपार प्राधिकरणाकडे सरकारच्यावतीने अतिरिक्त अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे हवालदार नाळे यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अशांतता पसरविण्याविरूद्ध यापुढेही अशी कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अधिक्षक बन्सल यांनी दिला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बंंसल यांनी आजपर्यंत २७ प्रस्तावांमध्ये तडीपारीचे आदेश दिले आहेत. आजच्या २८ व्या प्रस्तावात त्यांनी पाच जणांना तडीपार केले आहे. या प्रस्तावातील एकुण तडीपारांची संख्या १०३ झाली आहे. तडीपारांची सेंचुरी बंसल यांनी पूर्ण केली आहे.