
स्थैर्य, धुळदेव, दि. १४ ऑगस्ट : धुळदेव (ता. फलटण) येथील २३ फाटा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसह विविध शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिले आहे.
२३ फाटा येथील कॅनॉल ते आसू गावाकडे जाणारा रस्ता हा शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक, दूध संकलन वाहने आणि शेतकऱ्यांसाठी मुख्य मार्ग आहे. मात्र, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने, विशेषतः पावसाळ्यात, रुग्णांना आणि शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीकडे अनेकदा विनंती करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर रस्त्याचा विषय घेऊन दुरुस्तीचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. या ठरावाची लेखी प्रत आम्हाला मिळावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
मागणी मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा विशाल जाधव, अक्षय अब्दागिरे, ओंकार कोल्हे, प्रशांत नांदले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.