दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । मुंबई । ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी हे प्रमुख प्रवासाचे साधन आहे. प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण व मरळी एसटी बस स्थानकातील दुरुस्ती व आधुनिकीकरणाची कामे तात्काळ करावीत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सातारा पाटण व मरळी येथील बस स्थानकांची दुरुस्ती व आधुनिकीकरण याबाबत आढावा घेण्यात आला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, बस स्थानक इमारतीमध्ये प्रवाशांकरीता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रवाशांना बसण्याकरीता लाकडी आसन व्यवस्था यांचा समावेश असला पाहिजे. बस स्थानकातील प्रलंबित पुनर्बांधणीची कामे ही तात्काळ करण्यात यावीत. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.