भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर आणि पोकलॅन विकले; फलटण शहर पोलिसांकडून आंतरराज्य टोळीला अटक


स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर: शेतकऱ्यांकडून भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर आणि पोकलॅन परस्पर विकून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात फलटण शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर आणि एक पोकलॅन असा एकूण ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शेतकरी विनोद संपत माने यांनी, मोहम्मद हुसेन याने भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर व पोकलॅन परत न देता फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने तपास सुरू करून आरोपी मोहम्मद हुसेन याला नवी मुंबई येथून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आणि साथीदार हसमा रेहमानी कुंजी विहारी यांनी संगनमत करून, भाड्याने घेतलेले पोकलॅन खोपोली (जि. रायगड) येथे गहाण ठेवले होते आणि ट्रॅक्टर लपवून ठेवला होता. तसेच, त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून चोरलेला आणखी एक ट्रॅक्टर दलालामार्फत कर्नाटकात विकल्याचेही उघड झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसरा आरोपी हसमा रेहमानी विहारी कुंजी (वय ६४) याला मंचर (ता. जुन्नर) येथून अटक केली.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गाडे, संतोष चौके आणि गुन्हे शोध पथकाचे अमोलदार पोपट धोमणे, काकासो काणे, अतुन अवटे, जितेंद्र ठिके यांचा समावेश होता.


Back to top button
Don`t copy text!