सातार्‍यातील प्रथितयश सर्जन डॉ.अशोक गोंधळेकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य । 7 जुलै 2025 । सातारा । सातार्‍यातील प्रथितयश सर्जन डॉ अशोक गोंधळेकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दिनांक 6 जुलै 2025 ला सकाळी दुःखद निधन झाले. ते गेले काही दिवस आजारीच होते. नुकतेच त्यांचे एक मेजर ऑपरेशन झाले होते पण वृद्धापकाळाने शरीराने साथ दिली नाही व त्यातच त्यांचे निधन झाले.

सातार्‍यातील एक अध्वर्यू सर्जन डॉक्टर म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला होता.अनेक रुग्णांना त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळालेले होते.आज कित्येक रुग्ण त्यांच्याप्रती प्रचंड कृतज्ञता भाव राखून आहेत.आयुष्यात अनेक रूग्णांच्या सद्भावना हीच त्यांची खूप मोठी कमाई होती. सहकारी तत्वावर चालू झालेले बहुदा पहिलेच रुग्णालय जीवनज्योत रुग्णालय हे उभारण्यात व पुढे यशस्वीरित्या चालवण्यात डॉक्टर गोंधळेकराचा सिंहाचा वाटा होता.जीवनज्योत रुग्णालय व डॉ. गोंधळेकर यांचे अतूट नाते होते.सहकारी सर्जन असो वा अगदी नवखा नुकताच आलेला सर्जन असो डॉ.गोंधळेकरांचे संबंध हे मित्रत्वाचे वा कायम मदतीचा हात पुढे असणारे असेच नाते होते. प्रेमाचा पण मोलाचा सल्ला ही त्यांची खासियत होती.एखाद्या क्षेत्रात एखाद्याची भूमिका ही वडीलधारी व भिष्म पितामह ह्या रुपात असते. डॉक्टर अशोक गोंधळेकर हे त्या रुपात सातार्‍यातील शस्त्रक्रिया या क्षेत्रात ओळखले जायचे.त्यांच्याविषयी आदरभाव नाही अशी व्यक्ती हुडकणे अवघड आहे.

असंख्य शस्त्रक्रिया करूनही, प्रचंड अनुभव पदरी असूनही डॉक्टरांनी आपला विनम्र स्वभाव कधीही सोडला नाही.अतिशय शिस्तप्रिय सर्जन व नियमांना धरून रहाणारा सर्जन म्हणून त्यांची ख्याती होती. गैरमार्गाने प्रॅक्टिस हे त्यांच्या तत्वातच बसत नसे आणी शेवटपर्यंत त्यांनी या आपल्या तत्वाला तिलांजली दिली नाही. या सबंध प्रवासात डॉक्टरांना त्यांच्या उच्चशिक्षित भूलतज्ञ पत्नी डॉ. अपर्णा गोंधळेकर यांची मोलाची साथ मिळाली असे नाही तर त्या दोघांनी हातात हात घालून वैद्यकीय सेवा व संसार देखील यशस्वीपणे निभावून नेला.

 

सर्जिकल वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या असलेल्या प्रचंड योगदानाबद्दल सातारा सर्जिकल सोसायटी व सातारा इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी डॉक्टर अशोक गोंधळेकरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.सातार्‍यातील फक्त सर्जिकल क्षेत्रातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रात देखील एक प्रचंड पोकळी निर्माण करुन डॉ अशोक गोंधळेकर हे अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्यामागे त्यांच्या भूलतज्ञ पत्नी डॉ. अपर्णा गोंधळेकर, इंजिनिअर मुलगा सचिन, डेंटिस्ट मुलगी प्रिती व त्यांचे परिवार आहेत.डॉ. अशोक गोंधळेकर यांच्या निधनाबद्दल समाजातील सर्वच थरांमधून हळहळ व्यक्त होत आहे..


Back to top button
Don`t copy text!