
फलटण नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासकीय इमारती आणि सभागृहांची जुनी नावे बदलून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा अत्यंत कळीचा ‘विषय क्रमांक ९’ बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी ‘राजे गटा’त जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
स्थैर्य, फलटण, दि. २५ मार्च : फलटण नगरपरिषदेत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आज लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच सर्वसाधारण सभा अत्यंत वादळी आणि लक्षवेधी ठरली. या सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली असली, तरी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेला नगरपरिषदेच्या वास्तूंच्या ‘नामांतराचा’ विषय क्रमांक ९ अखेर बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नगरपरिषदेच्या इमारती आणि सभागृहांना आता देशातील थोर महापुरुषांची नावे दिली जाणार आहेत.
या सभेला उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय होता विषय क्र. ९ आणि त्यापुढील वाद?
नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्ते, चौक, मालकीच्या इमारती आणि सभागृहांची पूर्वीची नावे बदलून त्यांना महापुरुषांची नावे देण्याबाबतचा हा ठराव होता.
- सध्याची नावे: श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे.
- प्रस्तावित नवीन नावे: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत छत्रपती सईबाई महाराणीसाहेब.
या नामांतरास ‘सकल बहुजन समाजा’ने निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिला होता, तर विरोधी ‘राजे गटा’ने ‘नवीन इमारतींना नावे द्यावीत, मात्र जुनी नावे बदलू नयेत’ अशी भूमिका घेत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे सभागृहात यावर जोरदार चर्चा अपेक्षित होती.
सभागृहातील कामकाजाची आणि खडाजंगीची क्षणचित्रे:
- ठरावाचे वाचन: सत्ताधारी गटाचे नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी या विषयाचे सूचक म्हणून सविस्तर माहिती सभागृहासमोर वाचून दाखवली. याला संदीप चोरमले यांनी अनुमोदन दिले.
- विरोधकांची उपसूचना: यावर विरोधी गटाच्या सौ. श्वेता किशोर तारळकर यांनी उपसूचना मांडली. त्या म्हणाल्या, “ज्या ठिकाणी नव्याने नावे द्यायची आहेत त्याला आमचा विरोध नाही, परंतु पूर्वी दिलेली नावे बदलण्यास आमचा विरोध आहे. पूर्वी दिलेली नावे बदलण्याचा अधिकार व तरतूद नाही. असे केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अद्याप नाव नसलेल्या पूर्ण इमारतींना ही नावे द्यावीत.”
- सत्ताधाऱ्यांचा पलटवार: सत्ताधारी गटाचे नगरसेवक सचिन अहिवळे यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले, “हा सर्व समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. महापुरुषांची नावे देण्याला विरोध का? जर या महापुरुषांना मानणाऱ्या समाजाची मते तुम्हाला चालतात, तर त्यांची नावे का चालत नाहीत?” याला मीना काकडे यांनीही दुजोरा देत, “आमचे मतदान चालते, पण नावे का चालत नाहीत? ही नावे सभागृहाला दिलीच पाहिजेत,” अशी ठाम भूमिका मांडली.
- काकडे विरुद्ध अहिवळे: विरोधी गटाचे विकास काकडे यांनी अहिवळे यांच्या विधानावर आक्षेप घेत म्हटले की, “सचिन अहिवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एका जातीपुरते मर्यादित करण्याचे काम करत आहेत. बाबासाहेब संकुचित नाहीत, त्यामुळे इथे जातीचा विषय काढायला नको होता.” यावर सचिन अहिवळे यांनी विकास काकडे यांना थेट सवाल केला की, “तुमचा या नामांतराला होकार आहे की नकार? ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये उत्तर द्या.” या थेट प्रश्नावर विकास काकडे ‘हो किंवा नाही’ मध्ये स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत.
‘ही सर्वसामान्यांची नगरपालिका आहे’ – नगराध्यक्ष
सभागृहातील गोंधळ आणि चर्चेदरम्यान नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्व सदस्यांना बोलण्याची समान संधी दिल्याचे नमूद करत ते म्हणाले, “ही नावे सभागृहाला देण्यामागे सर्वसामान्य नागरिकांचीच भावना आहे. कारण ही नगरपालिका कोणत्याही एका गटाची नसून सर्वसामान्यांची आहे. तोच विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. ज्या महापुरुषांनी हा समाज आणि राज्य घडवले, त्यांचे मोठे योगदान आहे. तुम्ही-आम्ही या सभागृहात फक्त ५ वर्षे असणार आहोत; मात्र या महापुरुषांचा विसर पडू नये, यासाठी आपण सभागृहांना ही नावे देत आहोत.”
महापुरुषांच्या जयघोषात ठराव मंजूर
अखेर चर्चेअंती नगराध्यक्षांनी हा नामांतराचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले. ठराव मंजूर होताच सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देत मोठा जल्लोष साजरा केला.
