स्थैर्य, सातारा, दि.१३: सातारा तालुक्यातील अतीत, नागठाणे, काशीळ परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या सातबारावर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले आहेत. उरमोडी प्रकल्प पूर्ण होऊन अजूनही पाणी मिळाले नसून सातबारा वरील शिक्के कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. हे शिक्के संबधित विभागाने लवकर काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना देण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
उरमोडी धरण प्रकल्पांतर्गत बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी सातारा तालुक्यातील अतीत, नागठाणे, काशीळ परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीला स्लॅब लावण्यात येऊन जमिनीचे विभाजन अथवा हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या. उरमोडी धरणाचे कामही झाले असून प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसित गावठाणे ही उभी राहिली आहेत. मात्र ४० वर्षापासून सातारा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेले पुनर्वसन खात्याचे बंदीचे शिक्के अद्यापही जैसे थे च आहेत.
यामुळे येथील शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षापासून कुचंबणा चालू आहे. जमिनी संदर्भातील फेरफार असो किंवा बँकांकडून, शासकीय योजनेतून कर्जप्रकरणे करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची प्रकरणे नामंजूर होतात किंवा पुनर्वसन खात्याची परवानगी घेण्यासाठी विनाकारण हेलपाटे घालून आर्थिक नुकसान व मनस्ताप सहन करावा लागतो. कोणतेही कारण नसताना पुनर्वसन खात्याचे मनाई आदेशाचे हे शिक्के अजूनही कायम ठेवण्याचे कारण काय? ते अद्याप का काढले गेले नाहीत? वास्तविक हे शिक्के काढावेत म्हणून यापूर्वी दोन तीन वेळेला संबधित कार्यालयाशी पत्रव्यवहार, लोकप्रतिनिधींना घेऊन समक्ष भेटी,चर्चा झालेल्या आहेत. तरीसुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.उलट पुनर्वसनासाठी जमिनी देऊनही लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ला या धरणाचे पाणी अद्याप पर्यंत पोहोचलेच नाही. या सर्व बाबींमुळे परिसरातील शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष तसेच संतापाचे वातावरण आहे. तरी शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित या विषयाची आपण त्वरेने दखल घ्यावी व हे शिक्के एका महिन्यात काढून टाकण्याबाबत कार्यवाही व्हावी. अन्यथा अतीतसह तालुक्यातील आम्हा शेतकऱ्यांना उपोषण, आंदोलन यासारख्या मार्गाचा वापर करावा लागेल आणि याची जबाबदारी सर्वस्वी शासनावर राहील. यावेळी शफीक शेख, सुनील जाधव, चंद्रकांत यादव, सचिन जाधव उपस्थित होते.
सातारा : साताबारावरील पुनर्वसनाचे शिक्के काढा याबाबतचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना निवेदन देताना श्रीनिवास पाटील, चंद्रकांत जाधव, शफीक शेख आदी.