
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवून ‘खड्ड्यांचे विघ्न’ दूर करावे, अशी मागणी राजे गटाचे समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना निवेदन दिले असून, यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे हे देखील उपस्थित होते.
दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या काळात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी फलटण तालुक्यातून हजारो भाविक शहरात येत असतात, असे खानविलकर यांनी निवेदनात म्हटले आहे. सध्या शहरातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत किंवा निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आगमन आणि विसर्जन मिरवणुकांसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना या खड्ड्यांमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सर्व खड्डे बुजवावेत, अशी विनंती सर्व गणेश भक्तांच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे.