सर्वसाधारण सभा काढा अन्यथा आंदोलन; नगरविकास आघाडीचा साविआला इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । गेल्या तीन महिन्यापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने सर्वसामान्यांची विकास कामे खोळंबून पडली आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही तर खुर्चीत बसायचे कशाला ? असा सणसणीत सवाल नगर विकास आघाडीने निवेदनाद्वारे विचारला आहे . लवकरात लवकर सर्वसाधारण सभा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून नगरविकास आघाडीने हे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर केले .

निवेदन देताना नविआ च्यावतीने विरोधी पक्ष नेते अशोक मोने, नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम, शकिल बागवान, नगरसेविका सौ. लीना गोरे आदी उपस्थित होते. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अमोल मोहिते म्हणाले, सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा ही गेली महिने काढण्यात आलेली नाही. दि. 3 सप्टेंबर सभा घेतली होती. सामान्य जनतेचे प्रश्न राहिलेले आहेत. लवकरात लवकर सभा घ्यावी याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. 22 ऑक्टोबरला नगरविकास विभागाचे पत्र आले आहे. ते पत्र आल्याचे आम्हाला कळून दिले नाही. ते पत्र दाबण्यात आले आहे. सातारा विकास आघाडीला सभाच काढायची नाही. त्यामुळे हे निवडून कशाला आलेले आहेत. लोकांचे जर प्रश्न ह्यांना मार्गी लावायचे नव्हते तर कशाला खुर्चीवर बसायचे. सातारा विकास आघाडीचा बिनबोभाट कारभार चालला आहे. गेली एक महिना झाले अध्यक्षांच्या टेबलवर दाभोळकर पुरस्काराची फाईल पडून आहे. त्यावर सही होत नाही. कशासाठी अडवणूक करायची. नुसती सातारकरांची गळचेपी चाललेली आहे. कोणत्याही गोष्टी सातारा विकास आघाडीकडून क्लिअर करत नाहीत, असे त्यांनी आरोप केला. सर्वसाधारण सभेचा निर्णय न झाल्यास नगर विकास आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे .

सातारा विकास आघाडी मॅनेज पुरस्कार घेण्यात पटाईतं
पुरस्काराबबात अमोल मोहिते म्हणाले, पत्रकारांनी शहर फिरुन पाहिले तर दिसेल. कसं शहर दिसत ते. हा पुरस्कार यावर्षीच का मिळाला. यापूर्वीचे पुरस्कार मिळण्यापूर्वी शहराची तपासणी कमिटी करते. आता कोणती कमिटी आली. या पुरस्काराचे श्रेय द्यायचे झाले तर बापट साहेबांना जाते. त्यांनी माहिती अपडेट केल्याने हा पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले तर अविनाश कदम यांनी कचरा मुक्त शहर म्हणून साताऱयाला पुरस्कार मिळाला आहे पण बायोमायनिंगचा कोटयावधींचा घोटाळा झाला आहे. त्यावर जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली. अशा गोष्टी असताना पुरस्कार मिळाला हे सातारकरांचे नशिब आहे.


Back to top button
Don`t copy text!