दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच भाजपमधील वाढत्या संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यातच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून शिंदे गटावर आरोप केले जात असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. यातच आता ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत प्रियंका चतुर्वेदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, अमित शाह यांना सांगितले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांना पदावरून हटवा किंवा राजीनामा घ्या
पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये. ज्यांनी हे काम केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना पदावरून हटवणे, त्यांचा राजीनामा घेणे हेही योग्य ठरेल. कारण महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत पुढे बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. त्यावर ते मला म्हणाले की, आम्ही दोषींवर कारवाई करू. याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली हे सर्वांनी पाहिले आहे. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली आहे. त्यांना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागली आहे. ही कोणत्या प्रकारची कायद्याची स्थिती आणि कोणता न्याय आहे, अशी विचारणा प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.