
दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांतील शाळांमध्ये स्कॉलरशिपच्या धर्तीवरती मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन शुक्रवार दि. 28 रोजी करण्यात आले होते. एकूण 18 केंद्रावरती ही परीक्षा घेण्यात आली. यात इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील एकूण 5767 विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे ठेवण्यात आले होते.
या परीक्षेची तयारीसाठी संस्थेच्या सर्व शाखांमधील तज्ञ विषयाचे मार्गदर्शक शिक्षकांची समिती स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये इयत्तावार व विषयवार प्रश्नपेढी तयार करण्यात आली होती. त्याद्वारे प्रश्नपत्रिका काढणे, परीक्षा पार पाडणे व पेपर तपासणी व निकाल लावणे याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा तसेच तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा यशस्वी झाली.
या परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी एकूण गुणवत्ताप्राप्त 21 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले यामध्ये इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक ओमराजे संदीप जाधव (मुधोजी हायस्कूल, प्रांजल ज्ञानेश्वर जाधव (श्रीमंत सगुणामाता विद्यालय दालवडी), द्वितीय क्रमांक देवदत्त अमोल रोकडे (मुधोजी हायस्कूल), तृतीय क्रमांक शिवरत्न निलेश साळुंखे (श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदल), इयत्ता सहावी प्रथम क्रमांक वेदांगी संजय गोफणे, स्नेहा योगेश भंडलकर, द्वितीय क्रमांक कु. प्रगती विठ्ठल बनकर, तृतीय क्रमांक आयुष हिंदुराव भापकर, अनुश्री विकास चौधरी, आरुष युवराज निंबाळकर, स्वराली पंकज गायकवाड, इयत्ता सातवी प्रथम क्रमांक सर्वेश अभिषेक दोशी, द्वितीय क्रमांक इशिता सतीश जगताप, तृतीय क्रमांक श्रीराज राजेंद्र कलाल, इयत्ता आठवी प्रथम क्रमांक आर्या हेमंत अबदागिरे, द्वितीय क्रमांक अर्जुन अजित रणवरे, द्वितीय क्रमांक सोहम विकास धुमाळ, तृतीय क्रमांक मनेर जरीन अलीम, इयत्ता नववी प्रथम क्रमांक तन्मय संभाजी येळे, द्वितीय क्रमांक ओंकार रवींद्र भुजबळ (सर्व मुधोजी हायस्कूल), तृतीय क्रमांक सिद्धी अविनाश कापसे, (ज्योतिर्लिंग हायस्कूल, पवारवाडी) या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचा समावेश होता.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यासाठी मार्गदर्शनाचा अभाव आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते आपली गुणवत्ता सिद्ध करू दाखवतील. मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेमुळे येणार्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना शंभर टक्के फायदा होईल. संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संपूर्ण सहकार्य राहील. दरवर्षी याप्रकारे गुणवत्तापूर्ण दर्जेदार स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करावी. विद्यार्थ्यांच्या बौधिक विकासाला चालना मिळावी. मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.
यावेळी प्रशासनाधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य वसंत शेडगे, मुख्याध्यापक शिवाजी काळे, मुख्याध्यापक अण्णा ननावरे, मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य नितीन जगताप, उपप्रचार्य, सोमनाथ माने, पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
एस. बी. आटपाडकर यांनी प्रास्ताविक केले. बी. बी. खुरंगे यांनी आभार मानले.