सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाची गेल्या दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । देशाच्या तसेच राज्याच्या विकासात रस्त्यांचे मोठे योगदान आहे. ज्या भागांमध्ये रस्त्यांचा विकास झालेला आहे. त्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. रस्ते म्हणजे विकासाचा राज्य मार्ग, शासनाने सातारा जिल्ह्यातील रस्ते विकासावर भर दिलेला आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची, पुलांची कामे पूर्ण तसेच काही कामे सुरु आहेत. तसेच गेल्या दोन वर्षामध्ये शासकीय इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर रुग्णालयांची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली आहेत. बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली उल्लेखनीय कामांची माहिती या विशेष वृत्तात देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पूर्ण झालेली इमारतींची कामे :-

सा.बां. खात्यामार्फत मागील दोन वर्षात अनेक पूर्ण केलेल्या कामांमध्ये ग्रामीण रुग्णालय, काशिळ येथे इमारतीचे बांधकाम, कराड सर्किट हाऊसचे बांधकाम करणे व अधिकारी आढावा बैठकीसाठी अद्यावत सभागृह बांधणे, सातारा येथे छत्रपती शिवाजी संग्रहालयासाठी नवीन इमारत बांधकाम, कोरेगांव येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, यांच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे.

रस्ते व पुलांची पूर्ण झालेली उल्लेखनिय कामे :-

सा.बां. खात्याने सातारा जिल्ह्यातील पूर्ण केलेल्या विविध कामांमध्ये महाबळेश्वर-सातारा-रहिमतपूर-पुसेसावळी-विटा रा.मा.140 ची सुधारणा करणे, सातारा शहरामध्ये पोवईनाका येथे उड्डाण पूलाचे (ग्रेड सेप्रेटरचे) बांधकाम करणे, साकुर्डी-तांबवे-डेळेवाडी-आंबवडे-कोळेवाडी-उंडाळे-जिंती रस्ता प्रजिमा-62 वर तांबवे येथे कोयना नदीवर उंच पुल बांधणे प्रजिमा-55 ते काढणे शिद्रुकवाडी रस्त्यावर वांग नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (आर्च ब्रीज), ता.पाटण या उल्लेखनीय कामांचा समावेश आहे.

एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार केला रस्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता विश्वविक्रम :-

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्ण हा 39.671 किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. यामध्ये 39.671 कि.मी. रस्ता हा अवघ्या 14 तासात पूर्ण करुन या पूर्वीचा विजापूर-सोलापूर 25.54 कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडीत काढून नवा विश्वविक्रम स्थापित केला होता. हे काम 3 शिफ्टमध्ये एकाचवेळी 6 ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे 15 अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत 60 अभियंते, 47 पर्यवेक्षक, 23 गुणवत्ता नियंत्रक अभियंते, 150 वाहन चालक, 110 मजूर असे एकूण 390 कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले. या कामाचे उद्योजक श्री. जगदीश कदम यांचे समवेत, अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सुक्ष्म नियोजन करुन घेतले होते.

या टप्यामध्ये गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, कॅबरप्लॅट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी 8 मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, 7 मॉर्डन सेन्सर पेव्हर, 12 व्हायब्रेटरी रोलर, 6 न्युमॅटीक रोलर 180 डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामुग्रींचा वापर करण्यात आला. 1100 मे. टन डांबर व 6000 घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.

या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक, सचिव उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरुन कौतुक केले होते.


Back to top button
Don`t copy text!