दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । मुंबई । कार्गो हाताळणीमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के इतकी लक्षणीय वाढ करीत उल्लेखनीय आणि विक्रमी कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये 71 दशलक्ष टनांहून अधिक मालाची हाताळणी केली असून मागील वर्षी 52 दशलक्ष टन मालाची हाताळणी झाली होती. याशिवाय प्रवासी जलवाहतुकीत बोर्डाने प्रभावी कामगिरी केली आहे. सागरी उद्योगातील उत्कृष्टतेसाठी बोर्डाची वचनबद्धताच यातून दिसून येते,अशा शब्दात बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.
राज्याच्या बिगर-प्रमुख बंदरांचा विकास आणि नियमन करण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. त्याचे प्रत्यंतर यावर्षी दिसून आले आहे. नवीन व्यवसायांना आकर्षित करण्यात आणि त्याचा विद्यमान ग्राहक आधार वाढविण्यात बोर्डाला यश आले आहे. उद्योगातील प्रमुख भागधारक आणि संबंधित घटकांशी धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेही कार्गो हाताळणीत लक्षणीय वाढ होण्यास हातभार लागल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी म्हटले आहे.
कार्गो हाताळणीतील उल्लेखनीय कामगिरी बरोबरच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने प्रवासी जलवाहतूक क्षेत्रातही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. बोर्डाने आपल्या सेवा वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे, सन 2020-21 मधील 0.82 कोटी प्रवाशांवरून सन 2021-22 मध्ये 1 कोटी 36 लाख प्रवासी आणि सन 2022-23 मध्ये 1 कोटी 87 लाखापर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने वाढीव फेऱ्यासह नवीन मार्ग खुले केले आहेत आणि एकूण प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या आहेत. कोविड-19 महामारीमुळे सागरी उद्योगासाठी आव्हानात्मक कालावधीनंतर माल हाताळणी आणि प्रवासी वाहतुकीमध्ये महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची प्रभावी कामगिरी दिसून येत असून, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे यश हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे, कारण सागरी उद्योग व्यापार आणि वाणिज्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्गो हाताळणीतील वाढीमुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, ज्यामुळे राज्याच्या वाढीला हातभार लागेल. उद्योगाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सुविधा आणि सेवा वाढवण्याच्या योजनांसह, येत्या काही वर्षांत आणखी विस्तार आणि वाढीचा विचार सुरू आहे. उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेसह, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सागरी क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी योग्य स्थितीत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी नमूद केले.