
सातारा – नटराज मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संकल्प सोडताना रमेश शानभाग व वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी.
स्थैर्य, 13 फेब्रुवारी, सातारा : श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात साजर्या होणार्या महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांना सकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. वेदशास्त्र संपन्न दत्तात्रय शास्त्री जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सकाळी आठ ते बारा या वेळेत अनुज्ञा, विघ्नेश्वर पूजा, प्रधान संकल्प व ग्रामदेवता पूजन होऊन गणपती होम स्वस्ति पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध,नवग्रह होम होऊन आरती व प्रसाद वितरण झाला.
या कार्यक्रमांमध्ये नटराज मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमात वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट, अविनाश वाळींबे, चैतन्य वाळिंबे, पार्थ जोशी, प्रमोद कुलकर्णी,अद्वैत देशमुख ,यांचे सह नटराज मंदिराच्या ब्रह्मावृंदांनी सहभाग घेतला
मंदिराचे वतीने वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट ,व्यवस्थापक चंद्रन, मार्गदर्शक नारायणराव यांचे सह महाशिवरात्री महोत्सवाच्या संयोजिका सौ.उषा शानभाग आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी आणि वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत एकादश कलश स्थापना व लघुरुद्र जप,कमार्चना संपन्न होणार आहे. त्यानंतर महाशिवरात्रीला रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत लघुण्यास एकादशी रुद्र जप , लघु रुद्र होऊन व पूर्णाहूती होणार असून यावेळी महामंगल आरती व कलश यात्रा संपन्न होऊन मंदिरातील श्री मुलनाथेश्वर पिंडिस कलश महाअभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर अलंकार, नैवेद्य आरती व प्रसाद वितरण होणार आहे .याच दिवशी रात्री आठ ते 11 या वेळेत कलश स्थापना,लघुरुद्र जप आणि श्री नटराज पाचू पिंडिस कलश अभिषेक संपन्न होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे .
रविवारी दि.15 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते सोमवार दि. 16 फेब्रुवारी सकाळी पाच दरम्यान महाशिवरात्री जागरण कार्यक्रम संपन्न होणार असून हे सर्व कार्यक्रम श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट श्री नटराज महिला मंडळ व योगदान सत्संग यांच्या सौजन्याने होणार आहेत.

