धार्मिक स्थळं आणि शाळा दिवाळीनंतर सुरु करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.८ : मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुस-या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यभरातील जिल्हाधिका-यांना दिले. तसेच प्रार्थना स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे, भाजपा यांनी महाराष्ट्रातील मंदिरं कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र सरकारला विचारला. त्यासाठी आंदोलनंही केली. आता धार्मिक स्थळं दिवाळीनंतर उघडतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करताना हे आदेश दिले.

प्रार्थना स्थळे उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात, हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून त्यांची सातत्याने चौकशी करा. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी उभारण्यात आलेल्या रूग्णालय, केंद्रातील सुविधा काढून टाकू नका. उलट आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील याकडे लक्ष द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मास्क न वापरणा-यांविरुद्ध कडक कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिका-यांना केले.

रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना उपचारासाठी जी जम्बो सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत त्याची भविष्यात गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे. या सेंटर्सची आवश्यक तेथे देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी. या सेंटर्समधील कर्मचा-यांना सुटी देण्याचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत आहे त्यामुळे गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे ५००० खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या रुग्णालयाचे काम करताना जनहित लक्षात घेऊन करावे, अशी सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिका-यांना केली.

पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचं नियोजन आताच करावं त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा मुंबईत कशा प्रकारे परिणाम झाला याबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या २४४ केंद्र सुरू करण्यात आले असून दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क न वापरण्यांवर कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवाळीनंतर शाळा सुरू करा – मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!