
दैनिक स्थैर्य । दि. 31 मे 2025 । फलटण । संपुर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्यामुळे रस्ते, शेतजमीन व बर्याच ठिकाणी राहत्या घरांची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिले असुन पुरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मत मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
फलटण येथे झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील आले होते. त्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, मुख्याधिकारी निखील मोरे, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, फलटणचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्यासह राज्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले आहे. ज्या ज्या ठिकाणी पावसाने नुकसान झाले आहे; अश्या सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांचा अहवाल प्राप्त होतात शासन स्तरावर तातडीची मदत करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी यावेळी दिली.
फलटण शहरासह तालुक्यातून जो पालखी मार्ग जात आहे; त्याची जी दुरावस्था ह्या अवकाळी पावसामुळे झाली आहे; ते दुरुस्त करण्याच्या सोबतच संपुर्ण पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी नगरपरिषद, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व त्यानंतर मंत्रीमंडळाच्या विवध बैठका संपन्न होत असतात. यामध्ये अवकाळी पावसामुळे नादुरूस्त झालेल्या पालखी मार्ग तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश आम्ही देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील यांनी दिली.