स्थैर्य, सातारा, दि.११: भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या रिटेल व्यवसायात ४० टक्के हिस्सेदारी सुमारे १.४६ लाख कोटी रुपयांत ऍमेझॉनला विकू शकते. व्यवसाय जगतातील या मोठ्या बातमीची माहिती दोन्ही पक्षांतील करार व वाटाघाटीची माहिती असणाऱ्या एका व्यक्तीच्या हवाल्याने देण्यात आली आहे. सूत्रांनुसार, मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीबाबत ऍमेझॉनने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडशी चर्चा केली आणि संभाव्य देवाण-घेवाणीत रस दाखवला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले की, रिलायन्स ऍमेझॉनला कमीत कमी ४०% हिस्सेदारी विकू शकते. आकडेवारीनुसार, हा सौदा अस्तित्वात आल्यास अनेक दृष्टीने तो चकित करणारा असेल. यात जगातील दोन दिग्गज स्पर्धक कंपन्या सहकारी होतील. दुसरे, जगभरात सर्वात तेजीने वाढणाऱ्या ग्राहक बाजारपेठेत एक अति महाकाय जोडीचा कब्जा होईल. तिसरे, भारताच्या व्यावसायिक इतिहासात ही मोठी गुंतवणूक होईल. रिटेलमध्ये ७३.१५ लाख कोटी रुपयांच्या जागतिक बाजारात भारताची हिस्सेदारी किरकोळ आहे. येथे अद्यापही लोक गल्ली-बोळातील लहान स्टोअर व किराणा दुकानांतून दैनंदिन वस्तूंची खरेदी करतात.
२०० अब्ज डॉलर एमकॅपची पहिली भारतीय कंपनी
२०० अब्ज डॉलरच्या बाजार भांडवलाची पहिली कंपनी रिलायन्स डीलच्या वृत्तामुळे बाजारात तेजी आली. गुरुवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळली राहिली. कंपनीचे शेअर ७.२९ टक्के उसळून आतापर्यंतच्या सर्वात उच्च भावावर पोहोचले आहेत. गुरुवारी २१८३.१० वर खुला झालेला समभाग व्यावसायिक सत्र संपल्यावर २३१९ रुपयांवर बंद झाला. यासोबत कंपनीच्या बाजार भांडवलातही वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज २०० अब्ज डॉलरच्या(१४.६३ लाख कोटी रुपये) बाजार भांडवलाची पहिली भारतीय कंपनी झाली आहे.
जिओनंतर रिटेलमध्ये गुंतवणुकीचा ओघ
रिलायन्स समूहाचा तंत्रज्ञान उपक्रम जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक व गुगलसारख्या कंपन्यांची हिस्सेदारी विकून १.४६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जमा केल्यानंतर आता कंपनीच्या रिटेल शाखेत गुंतवणुकीचा कल सुरू आहे. रिलायन्स रिटेल आधीच सिल्व्हर लेककडून ७३१५ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज सुपरमार्केट्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक चेन स्टोअर, कॅश अँड कॅरी होलसेल, जिओ मार्ट आणि फॅशन आऊटलेट्स संचालित करत आहेत. कंपनीचे देशभरात सुमारे १२,००० स्टोअर्स आहेत.