स्थैर्य, दि.२४: टेल व्यवसायात उतरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ‘रिलायन्स रिटेल’मध्ये जागतिक गुंतवणूदार कंपनी केकेआर ५,५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून केकेआर रिलायन्स रिटेलमध्ये १.२८ टक्के भागीदारी विकत घेणार आहे. केकेआरकडून रिलायन्समध्ये ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी केकेआरने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११,३६७ कोटींची गुंतवणूक केली होती. रिलायन्स रिटेलमध्येही ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. याआधी अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूक फर्म सिल्व्हर लेकर पार्टनर्सने रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून सिल्व्हर लेकने कंपनीत १.७५ टक्के भागीदारी खरेदी केली होती. सिल्व्हर लेकने गुंतवणूक केली तेव्हाच केकेआरच्या गुंतवणुकीबद्दल चर्चा केली जात होती. दरम्यान, रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या देशभरात पसरलेल्या १२ हजारपेक्षा अधिक स्टोअर्समध्ये वार्षित जवळपास ६४ कोटी खरेदीदार येतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार केकेआरचे स्वागत आहे. डिजिटल सेवा व रिटेल व्यवसायात केकेआरच्या जागतिक प्लॅटफॉर्म, इंडस्ट्री नॉलेजचा फायदा घेण्यासाठी कंपनी तयार आहे. केकेआरचे सह-संस्थापक हेन्री क्रॉविस म्हणाले की, या गुंतवणुकीच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीसोबत कंपनी आपले संबंध आणखी वृद्धिंगत करत आहे.भारतीय रिटेल अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रिलायन्स रिटेलच्या मिशनला कंपनीचा पूर्ण पाठिंबा आहे.