दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील मालगाव येथे शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात एक तरस अडकले होते. या तरसाची मुक्तता सातारा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून त्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा तालुक्याच्या जंगली भागात काही शिकारी वन्यप्राण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी फासे टाकत आहेत, अशा शिकाऱ्यांचा वन विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
सातारा वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या मालगाव येथे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फास्यात तरस वन्यप्राणी अडकला असल्याची माहिती वनरक्षक सुहास भोसले यांना दि. १५ रोजी मिळाली होती. त्यानुसार सातारा तालुक्याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण आणि त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर जवळपास सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर तरसाची मुक्तता करण्यात आली आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तरसाची मुक्तता करण्यात पुणे येथील रेस्क्यू टीम आणि सातारा येथील डब्ल्यूएलपीआर टीमचे मोलाचे सहकार्य मिळाले.
सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सुधीर सोनवले, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी कोणी फासे टाकत असेल किंवा इतर यंत्र, हत्याराचा वापर करत असेल अथवा वन्यप्राण्याची शिकार करत असतील तर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये, असे आवाहन सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.