स्थैर्य, फलटण, दि. १३ : शहरातील कुरेशीनगर येथील एका टेम्पो मध्ये कत्तलीसाठी नेहण्याकरिता दाटीवाटीने डांबून ठेवलेली तब्ब्ल ३६ जनावरे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मिळून आली आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच संशियिता विरोधात गुन्हा दाखल केला असून हे संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले आहेत. या छाप्यात पोलिसांनी तब्ब्ल सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, गुरुवार दि. ११ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरेशीनगर येथे कत्तलीसाठी एका वाहनामध्ये गुरे डांबून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. या नंतर किंद्रे यांनी सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत कुरेशी नगर येथे छापा मारला असता त्यांना नगरपालिकेच्या शाळेजवळ एका टेम्पो मध्ये तब्ब्ल २६ जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच टेम्पो नजीक असणारे हुसेन बालाजी कुरेशी – वय ५५, तय्यब आदम कुरेशी – वय ४३, अल्ताफ जमील कुरेशी – वय २०, उमर अस्लम कुरेशी – वय ३० सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद वय – ५७ (गाडीचालक) रा. फडतरवाडी ता. फलटण हे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी पाच लाख २१ हजार रुपये किमतीची पिकअप गाडी क्र. एमएच ११ टी ५९९८ व त्यामध्ये २१ जर्सी जातीची वासरे व अकरा लाख ८० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो क्र. एमएच १२ एलटी ७६६६ व या गाडीमध्ये १० मोठे रेडे व पाच लहान रेडी त्या सोबत नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सतरा लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. या प्रकरणी वरील पाच जणांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सपोनि सचिन रावळ करीत आहेत.