
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : निरा-धोम धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पावसाचे अतिरिक्त झालेले पाणी तातडीने धोम-बलकवडी कालव्याला सोडून फलटण आणि खंडाळा तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला द्यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अनिलकुमार कदम म्हणाले की, एकीकडे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असताना, दुसरीकडे फलटण आणि खंडाळा तालुक्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. धरणांमधील अतिरिक्त पाणी जर धोम-बलकवडी कालव्याद्वारे या भागात वळवले, तर बाणगंगा व धुमाळवाडी धरणांसह ९२ पाझर तलाव, ५२८ नाला बंधारे आणि शेकडो शेततळी भरता येतील.
या पाण्यामुळे तांबवे, सालपे, हिंगणगाव, आदकी, बिबी, वडगाव, वाखरी, दालवडी, उपळवे, निरगुडी, सासकल, विंचुर्णी यांसह एकूण ८४ गावांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार मिळेल. भविष्यात पावसाने ओढ दिल्यास या पाण्याचा मोठा उपयोग होईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने दरवर्षी पावसाळ्यात जमा होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून ते शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कालव्यात सोडण्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी तातडीने फलटण येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करावे, अन्यथा दरवर्षीप्रमाणे लाखो लिटर पाण्याची संपत्ती वाया जाईल. प्रशासनाच्या या एका निर्णयामुळे दोन-तीन तालुक्यांतील शेतकरी आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा अनिलकुमार कदम यांनी व्यक्त केली आहे.

