दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । फलटण। वारीची परंपरा अखंडित सुरु ठेवावी, मंदिरे खुली करावीत, कीर्तन प्रवचनांना परवानगी द्यावी आणि युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांना पोलिसांनी करवडी, ता. कराड येथील पोलीस नजर कैदेतून मुक्त करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन आज (बुधवार) प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना येथे देण्यात आले.
वारकरी संप्रदाय मंडळ फलटण तालुका यांच्यावतीने आषाढी वारी 2021, महाराष्ट्रातील मंदिरे, संतांचे सोहळे आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावणारे अध्यत्मिक कार्यक्रमांवर राज्यभर असलेली बंदी मागे घ्यावी आणि युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांना त्वरित बंधमुक्त करावे आदी मागण्यांचे निवेदन फलटण येथे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. त्यावेळी ह.भ.प. दादासाहेब आप्पाजी शेंडे, ह.भ.प. गणपतराव बाबुराव निकम तथा बबनराव निकम भाऊ, ह.भ.प. नंदकुमार कुमठेकर महाराज, ह.भ.प. सत्त्यवान महाराज जाधव, ह.भ.प. विजय महाराज लावंड, ह.भ.प. दिगंबर गोरे, ह.भ.प. चंद्रकांत भोसले, ह.भ.प. सौरभ बिचुकले आदी वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षी सन 2020 मध्ये सर्व मंदिरे बंद होती, संतांचे पायी वारी सोहळे बंद होते मात्र कोणीही वारकर्यांनी ते सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत, त्यासाठी हट्ट अथवा आग्रही भूमिका घेतली नाही कारण कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता, लसीकरण व उपचार पद्धती याविषयी पूर्ण माहिती नव्हती परंतू चालू वर्षी सन 2021 मध्ये शासन प्रशासनाने त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळविले, उपाय योजना सुरु केल्याने पायी वारी, संतांचे सोहळे वगैरे मर्यादित स्वरुपात आणि कोरोनाचे सर्व नियम निकष सांभाळून सुरु करण्याची मागणी शासन प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचा विचार होऊन सकारात्मक निर्णय अपेक्षीत होता पण तसे घडले नसल्याबद्दल निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज बिजोत्सव कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर कोरोना विषयक सर्व नियम निकष सांभाळून केलेल्या सत्याग्रहाचे निमित्ताने हे सर्व सोहोळे, वारी परंपरा मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली हवेली प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवेदन स्विकारुन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात कसलीही चर्चा, कार्यवाही, निर्णय झाला नसल्याचे या निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
त्यानंतर तेच निवेदन व मागण्या विविध ठिकाणचे वारकरी मंडळांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना पाठविले मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करीत वास्तविक वारकरी मंडळींना बोलावून चर्चा केली असती तर योग्य समन्वयातून चांगला मार्ग निश्चित काढून वारीची परंपरा जपण्याबरोबर अन्य प्रश्न चर्चेने सहज सोडविता आले असते पण शासन प्रशासनाने तसे केले नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
महागाई वाढीसह अन्य मोर्चे, लग्न समारंभ, निवडणूका, राजकीय सभा, संमेलने, मॉल, मार्केट आदी ठिकाणी होणार्या गर्दीने कोरोना प्रादुर्भाव वाढत नाही परंतू शिस्तीने सर्व नियम निकष सांभाळून निघणार्या वारीने कोरोना प्रादूर्भाव वाढतो हे न पटणारे आहे, मर्यादित स्वरुपात पायी वारीला परवानगी देवून शेकडो वर्षाची परंपरा जपण्याची आमची मागणी रास्त असल्याचे शासन प्रशासनाने समजावून घेण्याची गरज नमूद करण्यात आली आहे.
आळंदी येथून पायी वारीचा आग्रह धरणार्या युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांना ताब्यात घेऊन कराडकडे नेताना पहाटे 5 ते दुपारी 2 या वेळेत त्यांना देशद्रोह्यांसारखी वागणूक देत त्यांच्या आंघोळ, भोजन, नित्यनियम करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत करवडी येथे पोहोचल्यावर मोकळीक दिली तरीही बंडा महाराज यांनी स्वतः स्वयंपाक करुन आपण स्वतः व सोबतच्या पोलीस अधिकारी/कर्मचार्यांनाही सुग्रास भोजन दिले ही बाब खरी असली तरीही त्यांना असलेला उच्च रक्तदाबाच्या विकारामुळे अन्नपाणी विश्रांती शिवाय काही विपरीत घडले असते तर कोण जबाबदार हा प्रश्न अनुत्तरित रहात असल्याने संयम, शांतता व शासन प्रशासनाला संपूर्ण सहकार्याची ग्वाही देवूनही असे का घडले असावे समजत नसल्याचेही निवेदनात नमूद आहे.
शासन प्रशासनाने अध्यत्मिक क्षेत्राबाबत घेतलेल्या भूमिकेचा फेर विचार करावा, समन्वयातून सर्वसमावेशक मार्ग काढावा, बंद असलेली मंदिरे, कीर्तन प्रवचन सेवा व अन्य धार्मिक कार्यक्रमांना काही निर्बंध घालुन परवानगी द्यावी त्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.