स्थैर्य, नागठाणे, दि.१३: आसनगाव(ता.सातारा) येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दीपक हणमंत पवार (वय.२६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.या घटनेची बोरगाव पोलिसांत आकस्मित मयत म्हणून नोंद झाली आहे.मात्र मृत दीपक पवार याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण रात्ती उशिरापर्यंत तणावपूर्ण होते.
याबाबत बोरगाव पोलीस व मृताच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आसनगाव येथील दीपक हणमंत पवार हा सोमवारी रात्री गावातील संभू पवार यांच्या घरी पूजा असल्याने सायंकाळी ७ वाजता जेवण कऱण्यासाठी गेला होता.तेथून तो रात्री १० वाजता कोणास काही न सांगता निघून गेला.
मंगळवारी सकाळी आसनगाव येथील आरसड नावाच्या शिवारात जांभळीच्या झाडाला साडीच्या काठाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दीपक पवार याचा मृतदेह आढळून आला.या घटनेची फिर्याद चुलते भानुदास विनायक पवार यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी दिली.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.पोलिसांनी आकस्मित मयत दाखल केले आहे.
दरम्यान,दिपकच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले. दीपक पवार याला सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावातीलच तीन लोकांनी खोऱ्याचे दांडके व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.रात्रीत तीन वेळा त्याला अशी मारहाण झाली असून त्याला सोडविण्यासाठी जाणाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली.मारहाणीचे वण दीपक पवारच्या अंगावर उठले होते.त्यानंतर दीपक हा तेथून गायब झाला होता.त्याचा घरातील लोक शोध घेत होते.मात्र सकाळी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृत्यू संशयास्पद असून बोरगाव पोलिसांनी याबाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.यावेळी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते.