दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड-19 या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत् व्यक्तीच्या निकट नातेवाईकांनी 50 हजार इतके सानुग्रह सहाय राज्य आपत्ती मदत निधी मधून प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे सहाय मिळण्याकरिता कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने शासनाने विकसीत केलेल्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय प्रदान करण्याबाबत परिपत्रकानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सविस्तर मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सहायाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. सानुग्रह सहाय अर्ज हा स्वत: किंवा सेतू केंद्रात व ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज भरु शकता.
mahacovid19relief.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करताना अर्जदारचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाईकांचे नाहकरत असल्याचे स्वयं घोषणापत्र कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
सानुग्रह सहायचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.on या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 202111261612210519 असा आहे. अधिक माहितीसाठी स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा यांच्या 02162-233377,230051 यावर तसेच डॉ. राहूल खाडे मो.क्र. 9011092711 व श्री सुरज किर्दत मो.क्र. 9011979701 यावरही संपर्क साधवा. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.