पश्चिम महाराष्ट्रात पुनर्वसन हा न संपणार विषय; लोकांचा पुनर्वसनाला प्रचंड विरोध; फलटण-खंडाळ्याचा आमदार म्हणून निरा-देवघरच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही माझी होती : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


या आरोपावर बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, निरा-देवघर धरण हे सुरू झालं १९९६ ला. त्याअगोदर ब्रिटीशांनी १९७२ च्या आसपास भाटघर धरण सुरू केलं. हे धरण नीरा नदीच्या एका उपनदीवर बांधलं गेलं. ते धरण बांधल्यानंतर ५०० मीटरवर तिचा निरेशी संगम होतो. त्यानंतर नीरा नदी कृष्णेला मिळते आणि कृष्णा नदी आंध्र प्रदेशमध्ये जाते. नीरा नदीचा उगम हिरडे खोर्‍यात आहे. माळशिरसच्या आसपास नीरा आणि भीमेचा संगम आहे. भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता मर्यादित आहे. २३ टीएमसी पाणी होतं. १९२६ ला डावा आणि उजवा कालवा हे दोन्ही कालवे तयार झाले. भाटघरचा धरणाचा नीरा डावा कालवा पहिला तयार झाला. त्यानंतर पाणी सुरू झाले. १९५२ च्या आसपास माजी आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे जेव्हा मंत्री इरिगेशन खात्याचे मंत्री होते, त्यावेळी त्याला बांधकाम खाते म्हणायचे. त्यावेळी भाटघरचे नीरा उजव्या कालव्याला ५५ टक्के पाणी दिले गेले आणि डाव्या कालव्याला ४५ टक्के पाणी दिले गेले. हे वाटप भाटघर धरणाचे झाले. विषय आहे तो निरा-देवघर धरणाचा. १९९६ ला मी जेव्हा आमदार झालो, त्यावेळी मी ‘कृष्णा लवाद’ वाचल्यानंतर हे लक्षात आले की, आपल्याला मोजून पाच वर्षे आहेत. ३१ मे २००० ला संपूर्ण कृष्णा खोर्‍यात न अडविलेले आणि ज्याचा वापर झाला नाही, अशा पाण्याचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे, असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये होता. प्रत्यक्षात ते झाले असते का नसते, हा विषय वेगळा. पण, रिस्क घेण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून मी त्यावेळी कृष्णा महामंडळाची स्थापना व्हावी, असे मी आणि माझे सहकारी आमदार यांनी भूमिका मांडली. त्यापूर्वी १९८५ ला मुख्यमंत्री शरद पवार यांनी निरा-देवघरला प्रशासकीय मान्यता दिली. वसंतदादा त्यावेळी मंत्रीमंडळात होते. त्यापासून ११ वर्षे म्हणजे १९९६ पर्यंत त्या धरणाचे काहीही काम झाले नाही. कारण त्यावेळी निरा-देवघरच्या पाणी साठवण खोर्‍यातील लोकांचा पुनर्वसनाला प्रचंड विरोध होता. तेथील अनंतराव थोपटे साहेबांचाही मोठा विरोध होता. निरा-देवघरचे पाणी साठवले गेले २००४-०५ च्या सुमारास व २००८ ला या धरणाचे काम पूर्ण झाले. मला मात्र या धरणाच्या खोर्‍यातील पुनर्वसन होणार्‍या २२-२३ गावांनी मोठे सहकार्य केले. मी त्यांच्यात फिरलो. मला युतीच्या काळात तेवढ्यासाठीच कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष केले होते. मी सुरुवातीपासून स्टेजवर बोलून गप्प बसत नाही, तर आपण बोललेलो काम अंमलात आणण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांवर कधीही अवलंबून राहिलो नाही. मी त्यावेळी लाभक्षेत्रातील आमदार होतो; तरीही मी पोलीस खात्याची मदत न घेता प्रत्यक्ष सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्या खोर्‍याने तेथे येऊ दिले नाही, तेथे मी फलटण-खंडाळ्याचा आमदार असूनही १९९६ सालापासून एकटा फिरत होतो. मी त्या खोर्‍यातील लोकांची समजूत घातली. मी त्यांना सांगितले की, फलटण-खंडाळ्याचा आमदार म्हणून पुनर्वसनाची जबाबदारी ही माझी आहे. आज झालंय कसं की, पश्चिम महाराष्ट्रात कृष्णेचे पुनर्वसन हा न संपणार विषय झाला आहे. योगायोगाची गोष्ट अशी आहे की, कोयना धरणाचे भूमिपूजन माझ्याच आजोबांनी केलं होतं. १९५७-५८ साली हे धरण पूर्ण झालं.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा…

आत्ता जे खासदार माढ्यातून निवडून आले आहेत, त्यांना कामच राहिलेलं नाही. फलटण-खंडाळ्यात दोन धरणं झाली. त्याच्यातील फलटण, माळशिरस, सांगोला तालुके आणि करमाळा तालुका व पंढरपूरचा काही भाग त्यांच्या मतदारसंघात आहे. काम दाखवायचं काय, असा प्रश्न या खासदारांपुढे आल्यानंतर देवघरचं पाणी निरेतून भाटघरमध्ये आणि तेथून वीर धरणात आल्यानंतर सुरुवातीला काही काळ भाटघरच्या डिस्ट्रिब्युशनसारखं वाटलं गेलं होतं. म्हणजे ५५ आणि ४५ टक्के. त्यावेळी डाव्या बाजूच्या कालव्यातील पाण्यावरून गोंधळ झाला होता. त्यावेळी अजितदादा आणि आम्ही बसलो. त्यावेळी ते म्हणाले की, आपण ५५ टक्के पाणी देवघरचे तिकडे देऊ आणि ४५ टक्के तुम्ही घ्या. त्यावर आम्ही म्हणालो की, दादा, आम्हाला विरोध झाला, आम्हाला पाणी कमी पडलं तर आम्ही हे ऐकणार नाही. या अटीवर आम्ही तसे करण्यास मान्यता दिली होती. मी त्या फाईलवर स्पष्ट लिहिलं होतं की, हा अन्याय होईल कारण बारामती आणि इंदापूर तालुका जिथे डाव्या कालव्याचे भाटघरचे पाणी जाते ते क्षेत्र निरा-देवघरच्या लाभक्षेत्रात नाही. निरा-देवघरच्या लाभक्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस एवढेच तालुके आहेत. परंतु त्यावेळी अजितदादांनी ते आग्रहाने करून घेतलं, ही वस्तुस्थिती आहे. पण, आम्हाला पाणी कमी पडले का? १९९६ पासून २००४ पर्यंत हे सर्व घडलं त्यावेळी आमच्या तालुक्यांत दोन साखर कारखाने होते. आज चार कारखाने आहेत. ते कसे काय झाले? आज निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात डबलीने ऊस लागलेला आहे. म्हणजे बारामतीला पाणी देऊन निरा उजव्या कालव्याच्या माळशिरस, फलटण आणि पंढरपूर येथे ऊस कमी झाला का? हे पाणी आले कुठून? याचा अर्थच पाणी वाटप ५५ व ४५ टक्के दाखवले गेले असले तरी पाणी हे आहे तेवढेच भरपूर आहे आणि त्यामुळेच ऊस लागलेला आहे. त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. २०१९ ला ते निवडून आल्यानंतर दुसर्‍या दिवशीपासून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, हे आरोप काही नवीन नाहीत.

राजकीयदृष्ट्या मी स्पष्ट सांगतो की, या खासदारांना कोणीही विचारत नाही. निरा उजव्या कालव्याच्या जवळजवळ ३६ ते ५५ पाणी वाटप संस्था आहेत. या संस्थांना विचारलं की, तुम्हाला पाणी कमी पडतंय का, तर ते नाही म्हणून सांगतात. त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की, जे कागदावर दाखवलं गेले आहे, ते जरी खरे असले तरी फलटण आणि माळशिरसला जे पाणी येत आहे, ते योग्य पाणी मिळत आहे. हा पूर्णपणे त्यांनी राजकीय विषय केलेला आहे. निरा उजव्या आणि डाव्या कालव्यात फक्त १० टक्के पाण्याचा फरक झाला आहे. म्हणजे अर्धा टीमएसी आणि प्रत्यक्षात मात्र तेही जात नाही, असा माझा दावा आहे. पाणी वाटप संस्थांची पाणी कमी पडतंय म्हणून माझ्याकडे तक्रार आलेली नाही. हे सद्गृहस्थ कधी पाटबंधारे खात्यात फिरतात का? यांना उसाची लागवड कशी करायची, हे त्यांना माहीत आहे का? उलट त्यांच्या कारखान्याविरुद्ध शेतकर्‍यांची तक्रार आहे. मुळात त्यांना ऊस घालायला कोण तयार नसतं. त्यांच्या कारखान्याला ज्यांनी ऊस दिला आहे त्यांना कधी बिले वेळेवर मिळत नाहीत. आज त्यांनी सहा ते सात हजार टनाचा कारखाना काढलेला आहे. रोज त्यांनी ९ हजार क्रशिंग दाखवलं, मग हा कारखाना फायद्यात जाईल का? त्यांनी ९.५% रिकव्हरी दाखवली आहे. शेतकर्‍यांना एफआरपी मिळतेय का? मी त्यांना विचारतो की, त्यांनी त्यांच्या कारखान्यात ओळखीचे पैलवान आणून ठेवले आहेत, ते कशासाठी? याचे उत्तर त्यांनी द्यावे. शेतकरी बिले मागायला गेले तर त्यांना मारून पाठवतात.
खासदारांनी आरोप केला आहे की, डाव्या कालव्यातून पाणी जास्त गेल्याने उजव्या कालव्यावरील जवळजवळ १० लाख शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे.

त्यावर रामराजे म्हणाले की, फलटण तालुक्यात दोन कारखाने वाढले आहेत ते चाललेत कशामुळे? हा मुद्दा आहे. श्रीराम साखर कारखाना आज जास्त क्रशिंग करत आहे. ३६ गावांच्या पाटबंधारे खात्याच्या ज्या लहान लहान सोसायट्या आहेत, त्यांच्या तक्रारी आहेत का? १० लाख शेतकर्‍यांना फटका बसला असता तर श्रीराम आणि दत्त कारखाना चालला असता का? खासदारांना काही काम राहिलेले नाही. त्यांना राजकीय बोलायला कुठेच काही मिळत नाही. धरणं झाली, एमआयडीसी झाली, रस्ते झाले. निरा-देवघरचं पाणी आलं नाही, हे मला मान्य आहे. त्यांनी हे जर सांगितले असते की, निरा-देवघरचं पाणी खंडाळ्यापर्यंत ६६ किलोमीटरपर्यंत आलं तेथून पुढे गेले नाही, ही रामराजेंची कमी आहे तर ते मी मान्य करतो. त्यालाही कारण आहे अनुशेषाचे. हे खासदार आहेत, त्यांनी आजपर्यंत पार्लमेंटमध्ये अनुशेषाबाबतीत किती वेळा प्रश्न मांडला आहे. त्यावर ते काही बोलले नाहीत. हे काम माझं आहे का त्यांचं आहे, हे त्यांनी सांगावं. १९९९ ला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा सत्तेवर आलो, त्यावेळी पाच वर्षे होती. त्यावेळी विदर्भाच्या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे आम्हाला रुपयातले २६ पैसे मिळत होते. त्या काळात कृष्णा महामंडळाचा असा विषय असा होता की, स्टोरेज आधी करायचे की कालवे बांधायचे? आम्ही त्यावेळी स्टोरेजला महत्त्व दिले. त्यामुळे आम्हाला कालवे बांधता आले नाहीत; परंतु त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते, पृथ्वीराज चव्हाणांचे उजवे होते. त्यांच्या नाकातले केस होते. ते त्यावेळी चव्हाणांबरोबर रात्रंदिवस राहायचे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निरा-देवघरसाठी काय केले? आज भाजपाचे खासदार म्हणून ते बोलत आहेत, त्यावेळी तुम्ही काय केले? त्यांचा स्वत:चा कारखाना जो हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे येथे आहे, हा धोम-बलकवडी धरणाचे पाणी जे मी शोधले त्याच्यावर चालला आहे. कृष्णेचे पाणी जे सांगलीवरून आंध्रला जाते, ते चार टीएमसी पाणी उचलले. ते उरमोडी, जिहे-कठापूर लिफ्टद्वारे.

आज फलटण तालुक्यात निरा-देवघर न झाल्याचा आरडाओरडा होत नाही. त्याचं कारण काय आहे की, धोम-बलवकडीचे पाणी आम्ही पाटाद्वारे सोडतो. त्यामुळे फलटण – खंडाळ्यातील विहिरी तुडूंब भरलेल्या असतात. त्यामुळे आज तेथे आरडाओरडा होत नाही. आज मार्चमध्ये तेथे टँकर लागले असते तेथे ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे आज त्यांनी हा विषय राजकीय केलेला आहे. त्यांना वैयक्तिक अशी भीती वाटते की, रामराजे जर उद्या माढ्यातून उभे राहिले तर काय होईल? हा कृष्णा महामंडळाचा किंवा निरा-देवघरचा प्रश्न नाही. हा निवडणुकीचा प्रश्न आहे.

माझ्या आजोबांनी कोयना केले, मी दोन धरणं नाही किती धरणे केली हे माझे मला सांगता येत नाही. आज सोलापूर जिल्ह्यातील लिफ्ट मी केल्या. आज खासदार सांगोल्याला मी पाणी आणलं म्हणतात. तेथे मी स्वातंत्र्यानंतर पहिल्या पाण्याचं पूजन केलं आणि हे आज तेथे माझ्या नावाने पुतळे जाळतायंत. मी पुन्हा एकदा सांगतो की, ५५ आणि ४५ झालंय का तर ते झालंय, पण त्याचे परिणाम मात्र काहीही झालेले नाहीत.

स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर खासदार होते, ते शिवसेनेत होते. ते प्रमिलाताई चव्हाण यांचे खास होते. त्यावेळी अल्टीमेट अथॉरिटी असताना त्यांनी त्यावेळी ते केलं नाही, केवळ रामराजे महामंडळाचा मंत्री, त्याच्यावर दुसरा मंत्री, त्यावर मुख्यमंत्री असताना पाणी वाटप केलं नाही, असे म्हणतात. त्यांचा राजकीय इतिहास बघितला पाहिजे. काँग्रेस आय, शिवसेना आणि भाजप, परत काँग्रेस आय आणि आता भाजपा. भाजपात हे सद्गृहस्थ गेले, तेव्हा १५ दिवस अगोदर ते सातारा जिल्ह्याचे काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष झाले होते. अशा राजकीय उड्या त्यांच्या केवळ स्वार्थासाठीच चालतात. आनंदराव अडसूळ राज्यमंत्री असताना ते शिवसेनेत गेले. त्यांनी त्यावेळी दुधाचे संकलन सुरू केले. स्वराज्य डेअरी नावाने सुरू केले, तीही त्यांनी विकून टाकली. ४०० कोटींचे कर्ज असलेला हा माणूस त्यांनी डेअरी कोणाला विकली, हा ईडीचा विषय आहे.

या खासदार सद्गृहस्थांचे काहीही खरे नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, रामराजेंनी ३० वर्षे केलेल्या कामाचे श्रेय त्यांना मिळू नये. मी निरा-देवघर नव्हे तर कृष्णेचे सातारा जिल्ह्याचे १२० टीएमसी पाणी जाण्याची शक्यता होती. आमच्याच धरणात त्यावेळी पाणी नव्हतं. आमच्याच धरणाची सुरुवात झालेली नव्हती. कृष्णेत जी काही खोरी आहेत, कुकडी झाली होती, उजनी झाली होती, कोयना झाली होती, वारणा झालं होतं, राधानगरी झाले होते, या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना आज सातारा जिल्ह्याचं १२० टीएमसी पाणी वाचलं. कृष्णेचे ८१ टीएमसी पाणी जास्त मिळविण्याचा मला रास्त अभिमान आहे. पाणी घालवलं नाहीच नाही, पण ८१ टीएमसी पाणी वाढवून घेतलेलं आहे. हे माझ्या ३० वर्षांच्या राजकारणाचं फलित आहे. मी राजकारण सत्तेसाठी केलेले नाही. मी जेव्हा पहिल्यांदा लवाद वाचला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आपल्या हातून हे झालं तरच पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे.

आपली लोकं मुंबईत काय करतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कोण हमाली करतो, कोण पेंटींगचं काम करतो, कोण कापड बाजारात आहे. त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला पाणी पाहिजे आणि ते मी केलं. मी हे राजकीयद़ृष्ट्या केलेच पण पाण्यावर मी राजकारण केलं. ते मी ३० वर्षे न काही बोलता केलं. अनुशेषाच्या प्रश्नात पश्चिम महाराष्ट्र हा एकटा पडतो. कोकणचा विरोध, मराठवाड्याचा विरोध, विदर्भाचा तर विरोधच विरोध. या तिन्हीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमदार विधानसभेत अस्वस्थ होऊन बसलेले मी बघितलेले आहेत. कृष्णेचे पाणी ३१ मे २००० ला जाणार होते. याचा विषय त्यावेळी प्रामाणिकपणे राज्यातल्या सरकारांनी घेतलेला नाही. त्याच्यावर कुठलीच स्पेशल तरतूद झाली नाही. तीन राज्ये याच्याशी संबंधित होते. एक महाराष्ट्र, एक कर्नाटक आणि एक आंध्र. कोणाच्याच त्यावेळी हे लक्षात आलेले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आपण डबके डबके बांधत बसलो. ८०० ते ९०० टीएमसी पाणी आंध्रला मिळाले. त्यांनी फक्त दोन धरणं बांधली. ८०० टीएमसी पाणी त्यांनी या धरणात अडवून ठेवलं आहे. कर्नाटकनं अलमट्टी आणि नारायणपूर तसेच अजून एक-दोन धरण बांधून त्यांचं पाणी अडवून ठेवलं. त्यावेळी ६००० कोटी दिले असते तर हे झाले नसते. ते ६००० कोटी कृष्णा महामंडळाच्या कर्जरोख्यांतून मिळाले. त्याचेही श्रेय कोणी घेऊ शकत नाही. २२ आमदारांनी त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशींना पत्र दिलं, त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं. त्याची पहिली मागणी फलटण तालुक्यात मुधोजी क्लब येथील ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलावून मीच केली होती. त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील तेथे उपस्थित होते. मी त्यावेळी पहिली मागणी केली होती की, आम्हाला तुमचे मंत्रीपद नको, आम्हाला १० टक्क्यातले फ्लॅट नकोत, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त महामंडळ द्या. त्यावेळी विधानसभेची रचना बघितली तर ४५ अपक्ष आमदार होते. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी काँग्रेसला एवढा विरोध झाला नव्हता. बाकीचे पक्ष एवढे सबळ नव्हते. त्यावेळी शिवसेनेला आम्ही अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला व कर्जरोख्यांतून कृष्णा महामंडळाची स्थापना पश्चिम महाराष्ट्रातील २२ आमदारांच्या दबावामुळे युती सरकारला त्यावेळी करावी लागली. त्यानंतर १७०० कोटी रुपये पहिल्या सिरीजमध्ये मिळाले. त्यानंतर भराभरा टेंडर निघाली आणि धरणाची कामे मार्गी लागली. सातारा जिल्ह्यातील २७ हजार प्रकल्पग्रस्त आपण दुष्काळी भागात हलवू शकलो, त्यामुळे आपली धरणे पुढे गेली. निरा-देवघरच्या दर्‍याखोर्‍यातील प्रकल्पग्रस्तांसाठी फलटण आणि खंडाळा लाभक्षेत्रातील लोकांनी स्वेच्छेन जमिनी सोडल्या. जिथे मुख्यमंत्र्यांना येऊ दिले गेले नाही, त्या धरणाचे भूमिपूजन आम्ही केलेले आहे, त्यावेळी हे खासदार आणि त्यांचे वडील कोठे होते, ते त्यांनी सांगावे. मी आणि माझ्याबरोबरच्या २०-२५ आमदारांनी हे केलेले आहे, हे त्या सगळ्यांचे श्रेय आहे. त्यावेळी सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख हे आमच्या विरोधात असूनही त्यांनी तात्विक विरोध केला. ते पाण्यासाठी झगडले. त्यांनी आम्हाला आशिर्वाद दिलेत. मी जेव्हा विधान परिषदेला उभा राहिलो, तेव्हा त्यांनी शरद पवार, अजितदादांना सांगितले की, मला रामराजेंना मत टाकायचे आहे. म्हणजे ज्या सांगोल्यात माझा पुतळा जाळला जातो, तिथे ४२ वर्षे जो आमदार होता, त्या आमदाराने मला निर्धास्तपणे मत दिले, हे माझ्या कामाची पावती आहे. म्हैसाळच्या ओढ्याचे पाणी म्हणजे कृष्णेचे पाणी मी सांगोल्याला दिले आहे आणि हे माझे तेथे पुतळे जाळत आहेत.

हे खासदार इरिगेशनवरच का बोलतात? केंद्राच्या ग्रामीण विकासाच्या, अर्बन डेव्हलपमेंटच्या स्कीमस् नाहीत? त्यावर ते का बोलत नाहीत? मला एक सांगा की, फलटण गावासाठी त्यांनी काय केले आहे? हे फक्त राजकीय नाटक आहे.


Back to top button
Don`t copy text!