दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑक्टोबर २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी साठी नियमित बस सेवा सुरू करण्याची बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ने केलेली मागणी रास्त असून येत्या काही दिवसात तांत्रिक बाबी तपासून नियमित बस सेवा चालू करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे जिल्हा विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने एमआयडीसी विश्रामगृहात आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार म्हणाले की दोन-तीन वर्षांपूर्वी एसटीची नियमित बस सेवा उपलब्ध होती परंतु कोविड व अन्य कारणांमुळे सदर बस सेवा बंद करण्यात आली त्यामुळे उद्योजक, कामगार, विद्यार्थी व एमआयडीसी परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांना अक्षरशः लुटत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. विद्यार्थिनी व महिलांच्या छेडछाडीच्या घटना वारंवार घडत आहेत. अवाजवी रिक्षा भाड्यामुळे कामगार देखील उद्योजकांना वाढीव प्रवास खर्चामुळे पगार वाढ मागत आहेत. अवैध वाहतूक व असुरक्षित वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी नियमित बस सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी अध्यक्ष धनंजय जामदार यांनी या बैठकीत केली.
एमआयडीसी मधील बससेवेचे नियोजित मार्ग, फेऱ्या, अधिकृत थांबे, मासिक पासची व्यवस्था, बसची संख्या, शिवशाही बस तिकिटाचे वाढीव तिकीट दर, बस स्टॅन्ड वरील राजेरोस चालणारी अवैध प्रवासी वाहतूक आदीबाबत उद्योजकांनी मुद्दे या बैठकीत उपस्थित केले.
बारामती इंडस्ट्रियल मेनुफॅक्चरर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर, मनोहर गावडे,शिवाजी निंबाळकर, संभाजी माने, अंबीरशाह शेख वकील, हरीश कुंभारकर, कॉटन किंग कंपनीचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड, पंढरीनाथ कांबळे, राजेंद्र साळुंखे, संजय थोरात, राजेंद्र पवार, हरीश खाडे, विजय झांबरे, ऋषी वाघमारे, राजन नायर, आशिष पल्लोड, रघुनाथ दाभाडे, आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.