साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाची गाळे नोंदणी 5 नोव्हेंबरपासून सुरु


स्थैर्य, सातारा, दि. 7 नोव्हेंबर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाची गाळे नोंदणी 5 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे, अशी माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

साता-यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे असे होईल. सातार्‍यात वाचन संस्कृती रुजली आहे. जिल्ह्याला मोठी साहित्यिक परंपरा आहे. हे संमेलन भव्य अशा शाहू स्टेडीअमवर होणार असून ते बसस्थानकापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. या संमेलनात प्रथमच चार दिवस ग्रंथ प्रदर्शन होणार असून ही वाचकांसाठी पर्वणी आहे.

संमेलनात एकूण गाळ्यांची संख्या 250 असेल. गाळ्याचा आकार 9 बाय 9 फूट असा आहे. गाळ्यामध्ये 2 टेबल, 2 खुर्च्या, दोन विजेचे दिवे, एक पॉवर कनेक्शन असेल. गाळ्याचे शुल्क प्रति गाळा चार दिवसांसाठी आकारण्यात येईल. प्रति गाळा एका व्यक्तीसाठी निवास, भोजन, चहा, नाष्टा याचा या शुल्कात समावेश आहे. ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरता येईल. तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत रोख स्वरुपात जमा करता येईल. मात्र पावती अथवा चलन अर्जासोबत अपलोड करावे लागेल. गाळ्यातील सर्व साहित्याची, सामग्रीची सुरक्षा, जबाबदारी, विमा या गोष्टी गाळाधारकांनी करावयाच्या आहेत. आयोजन समिती त्यास जबाबदार असणार नाही. गाळ्याचे वाटप ड्रॉ पध्दतीने होणार आहे. एका संस्थेला, व्यक्तीला कमाल सहा गाळे नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ग्रंथ गाळे समितीच्या प्रमुख सुनिताराजे पवार, प्रतिभा विश्वास, कुंडलिक अतकरे, गजानन नारे हे असून चंद्रकांत सणस हे मुख्य समन्वयक तर विद्या पोळ, योगेश शिंदे समन्वयक तर सारडा सहसमन्वयक आहेत. समितीत भूषण क्षीरसागर, अजिज पटेल, अक्रम बागवान या सदस्यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!