
स्थैर्य, मुंबई, दि.२४: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकले आहे. नाशिकवरुन निघालेला हजारो शेतकऱ्यांचा हा मोर्चा थोड्याच वेळात वडाळा शिवडी मार्गे आझाद मैदानात धडकेल.
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनात आता राज्यातील शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. राज्यातील 21 जिल्ह्यांतील शेतकरी नाशिक ते मुंबई अशी 180 किलोमीटर रॅली काढत आहेत. शेतकऱ्यांचा हा मोर्चा 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चाद्वारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
शनिवारी नाशिकमध्ये एकत्र जमले होते शेतकरी
दिल्ली सीमेवर 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या आधी नाशिकमध्ये शनिवारी हजारो शेतकरी जमले होते. यानंतर त्यांनी रॅलीची सुरुवात केली. वृत्त संस्थेवर जारी व्हिडिओत शेतकऱ्यांचा रोष दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात झेंडे आणि बॅनर दिसत आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली काढण्यात येणारा हा मोर्चा काही तासांत मुंबईत दाखल होईल.
पवार यांनी केंद्राला दिला होता इशारा
कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता की, जर ते शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असेही ते म्हणाले होते.