बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग तर होत नाही ना? केंद्राने प्रथमच अशा संशयिताचे नमुने एनआयव्हीला पाठवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१२: आतापर्यंत असे मानले जात आहे की एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण बरा झाला तर त्याच्यात अँटिबॉडीज तयार होतात. म्हणजे त्याला पुन्हा संसर्ग होऊ नये. पण बरे झालेल्या रुग्णांत पुन्हा कथितरीत्या संसर्ग झाल्याची प्रकरणे गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगणमध्ये समोर आली आहेत. पुन्हा संसर्ग म्हणजे रि-इन्फेक्शनमध्ये किती वस्तुस्थिती आहे आणि जर असेल तर ते कसे होत आहे… याच्या वैज्ञानिक तपासणीसाठी प्रथमच भारत सरकारने एका रुग्णाचे पहिल्या व दुसऱ्या संसर्गाचे असे दोन नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (एनआयव्ही) पाठवले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, दिल्लीच्या एका रुग्णाचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

रि-इन्फेक्शनचा अर्थ काय, पुण्याची एनआयव्ही काय करणार हे जाणून घेऊ


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत रुग्णाच्या दोन्ही नमुन्यांचे जेनेटिक सिक्वेन्सिंग केले जाईल. जेनेटिक सिक्वेन्सिंगद्वारे कुठल्याही जिवंत प्राण्याच्या पेशींची संरचना पाहतात. त्यातील निकालांतून राज्य व केंद्राच्या अनेक दाव्यांतील तथ्य समोर येईल.

ज्याचे दोन्ही नमुने पाठवले आहेत तो दोन्ही वेळा आरटी-पीसीआरमध्ये पॉझिटिव्ह आढळला…


– दोन्ही नमुन्यांत विषाणू आहे की नाही हे एनआयव्हीच्या तपासणीत कळेल. जर कुठल्याही एखाद्या नमुन्यात विषाणू आढळला नाही तर त्या चाचणीत कुठली ना कुठली चूक झाली हे प्रमाणित होईल. एनआयव्हीत याच बाबीची प्राथमिक तपासणी होईल.

देशात कोरोनाचा एकच प्रकार आहे असेच आरोग्य मंत्रालय अजूनही म्हणत आहे…


– तपासणीत दोन्ही नमुन्यांत विषाणू आढळला तर दोन्ही विषाणूंच्या संरचनेत काही बदल झालेला आहे की नाही याचीही माहिती मिळेल. बदल झाला तर हे सिद्ध होईल की, देशात विषाणूचे एकापेक्षा जास्त प्रकार आहेत आणि विषाणू आपले स्वरूप बदलत आहे. तसे झाल्यास दोन्ही प्रकारांचा अभ्यास होईल.

आपल्या प्रश्नांची उत्तरे २ तज्ज्ञांकडून जाणून घेऊ


विषाणूचे रूप बदलले तरी लस उपयुक्त ठरेल… तरीही सावधगिरी आवश्यकच

– विषाणूचे रूप बदलले तर लस वाया जाईल?

विषाणू नेहमी रूप बदलतो. आतापर्यंत असा वैज्ञानिक पुरावा नाही ज्यावरून असे म्हणता येईल की विषाणूच्या रूपातील बदलामुळे कोरोनाची लस उपयुक्त ठरणार नाही.

– बरे झालेल्या रुग्णांनी कोणती अतिरिक्त काळजी घ्यावी?

काही देशांत झालेला अभ्यास असे सांगतो की, बरे झालेल्यांत अँटिबॉडी ३ महिन्यांपर्यंत प्रभावी राहते. बरे झाल्यानंतरही एका सामान्य व्यक्तीप्रमाणे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

– बरे झालेल्यांची चाचणी निगेटिव्ह येत आहे का?

अनेकदा विषाणू शरीरात इतक्या कमी प्रमाणात असतो की, आरटी-पीसीआर तपासणीतही निगेटिव्ह रिपोर्ट येतो, कारण त्याची संवेदनशीलता ९० टक्केच असते. त्यामुळे एकदा संसर्ग झाला, आता कुठलीही भीती नाही असा विचार करणे चुकीचे आहे.

डॉ. ज्योती मुट्‌टा, सीनियर कन्सल्टंट, मायक्रोबायोलॉजिस्ट, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट.

– प्रो. शाहिद जमील, व्हायरॉलॉजिस्ट आणि वेलकम ट्रस्ट ऑफ डीबीटी इंडिया अलायन्सचे सीईओ

धडा : इतर देशांपासून धडा घेऊन लवकर सुरू केली तयारी

याआधी हाँगकाँग, बेल्जियम, नेदरलँड आणि काही युरोपीय देशांतही कोरोना संसर्गाच्या रि-इन्फेशनची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे भारतातही ही स्थिती उद्भवू शकते, असे भारत सरकारलाही वाटत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी आणि रि-इन्फेक्शनची सर्व प्रकरणे रेकॉर्डवर आणण्यासाठी एक कन्सेप्ट नोट तयार केली आहे. ती लवकरच सर्व राज्यांना पाठवली जाईल. त्यासाठी एक फॉरमॅटही तयार केला जात आहे. या फॉरमॅटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नमुन्यांच्या तपासणीची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर या रेकॉर्डचा वैज्ञानिक अभ्यास केला जाईल. रि-इन्फेक्शनची माहिती जाणून घेण्यासाठी ही तपासणी फक्त पुण्याच्या एनआयव्हीमध्ये आणि दिल्लीच्या एनसीडीसीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रि-इन्फेक्शनची स्थिती येण्याआधीच तिला तोंड देण्याची तयारी सरकार करत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!