दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२१ | गोखळी | या भागातील शेतकऱ्यांच्या कापसाला (पांढरे सोने) विक्रमी प्रति क्विंटल८५०० असा भाव निघाला असून सदर दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षी कापूस उत्पादकांना ५ ते ६ हजार रुपये पर्यंत दर मिळाला होता, यंदा मराठवाडा विदर्भामध्ये कपाशी, सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आणि देश परदेशातून मागणी वाढल्याने यावर्षी कापसाला सुरुवाती पासून चांगला दर मिळत आहे. कापूस खरेदीसाठी परप्रांतातील व्यापारी शेतकऱ्यांकडे चकरा मारताना दिसतात. खाजगी व्यापारी कापूस कमी दराने खरेदी करतात, खरेदीच्या प्रत्येक क्विंटल मागे २, ते ५ किलो घट वजा करुन बिल अदा करतात परिणामी शेतकऱ्यांना कमी दर मिळतो, येथील कापूस उत्पादक शेतकरी संघटीत झाल्याने एकमेकांना विचारुन खाजगी व्यापाऱ्यांना कापूस देत असल्याने वजन घट, काटामारी, फसवणूक याला येथे संधी नाही, काही शेतकऱ्यांनी कर्जत, श्रीगोंदा, अहमदनगर, परभणी या भागात जाऊन जिनिंग अँड प्रेसिंग संस्थांशी संपर्क करुन त्यांना थेट कापूस घातल्याने त्याद्वारे शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल ७ हजार ते ८५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला अद्यापही कापसाला दर वाढण्याची शक्यता कापूस क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षापासून अमेरिका चीन मधील व्यापार युद्धामुळे कापसाची मागणी घटली होती त्याचबरोबर कीड रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाचे क्षेत्र घटले होते, परिणामी ऊसाचे क्षेत्र वाढले, तथापी कीड रोगाचा प्रादुर्भाव नाही, हवामान समाधानकारक असल्याने एकरी उतारा वाढला आणि आता दर चांगले मिळत असल्याने आगामी काळात कापसाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा आहे. यावर्षी भारताची कापूस निर्यात वाढली असल्याने कापसाला चांगला दर मिळत असल्याचे बोलले जात आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापसाची मागणी वाढणार आहे. सध्या बाजारात आवक कमी आहे. शासकीय कापूस खरेदी अद्याप सुरु झाली नाही खाजगी जमीन मालक कापूस खरेदी करताना दिसत आहेत मात्र शासकीय कापूस खरेदी दर अपेक्षित निघेल अशी शक्यता वाटत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.