दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२३ । मुंबई । पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख 64 हजार 607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5 लाख 77 अशा एकूण 11 लाख 64 हजार 684 वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली आहे.
‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत देहू-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 27 ते 29 जून 2023 या कालावधीत वाखरी, गोपाळपूर व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.
मंदिर परिसरामध्ये, वाळवंट ठिकाणी 3 व 65 एकर येथे एक ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले. आपला दवाखान्याच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 10 खाटांच्या क्षमतेच्या अतिदक्षता विभागासह व पंढरपूर शहरामध्ये 17 ठिकाणी अशा एकूण 20 ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली व रुग्णांशी, डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवादही साधला. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबाबत समाधान व्यक्त केले होते.
देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा
देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर एकूण 6,64,607 वारकऱ्यांना मोफत तपासणी व उपचार
प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर 233 तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’ मार्फत मोफत आरोग्य सेवा
पालखी मार्गावर 24×7 अशा एकूण 194 आणि अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी 108 एकूण 75 रुग्णवाहिकांमार्फत 19,853 वारकऱ्यांना सेवा; 847 वारकऱ्यांना योग्य वेळी अत्यावश्यक उपचार व संदर्भ सेवा, पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन पालखी बरोबर एकूण 9 आरोग्य पथके
एकूण 124 आरोग्यदुतांमार्फत बाईक ॲम्बुलन्सने आरोग्य सेवा, 3,500 औषधी किटचे दिंडी प्रमुखांना मोफत किट वाटप, 7460 हॉटेल्स मधील 10450 कामगारांची आरोग्य तपासणी, पाणी नमुने तपासणी
पालखी मार्गावर 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा, मुक्कामाच्या ठिकाणी धुर फवारणी, पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे ओटी टेस्ट, जैव कचरा विल्हेवाट, आरोग्य विषयक जनजागृतीसाठी चित्ररथ, पंढरपूर येथील तीनही महाआरोग्य शिबिर, आपला दवाखाना (वाळवंट व इतर) येथे 27 ते 30 जून 2023 दरम्यान 5 लाख 77 लोकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार; आरोग्य विभागामार्फत 3,718, खासगी वैद्यकीय व्यावसायिक 500 व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक 1500 असे एकूण 5,718 मनुष्यबळामार्फत मोफत आरोग्य सेवा, नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कर्करोगासारख्या रोगांवर मोफत उपचार, वारकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया, रुग्णांच्या मोफत 40 प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या, प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर, रुग्णांना अतिविशेषतज्ज्ञांमार्फत ऑन्कोलॉजी, न्युरो सर्जरी, गॅस्टोइट्रॉलॉजी यासारख्या वैद्यकीय सेवा, मोफत 77,854 चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया; प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी 5 बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत, त्यामध्ये 154 रुग्णांना सेवा, अत्याधुनिक रेडिओ डायग्नॉस्टिक सुविधा, मंदिर परिसरामध्ये आरोग्य दूतांमार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्स, शिबिराकरीता ईएमएस 108 च्या 15 रुग्णवाहिका, आषाढी वारीसाठी 15 रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह तैनात करण्यात आली होती.