दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंतची रेकॉडब्रेक कारवाई करत पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून एक दरोडा, एक जबरी चोरी, १९ घरफोडी असे एकूण २१ गुन्हे उघड केले आहेत. या कारवाईत ३५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ६४ तोळे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ३६ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईची माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले आहे.
दि. १३ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी चाँद उर्फ सूरज जालिंधर पवार याचा लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये सहभाग असून तो काळज गावच्या हद्दीतील ‘बडेखान’ या ठिकाणी आहे. तसेच हा आरोपी अत्यंत हुशार असून तो गुन्ह्याच्या तपासकामी मिळून येत नव्हता. त्याच्या गुन्हे पद्धतीचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार तानाजी माने, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, स्वप्नि माने, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड यांच्या तपास पथकाने बडेखान परिसरात सतत तीन दिवस सापळा लावून रानावनात, काटेरी झुडूपांतून त्याचा पाठलाग करून आरोपी चाँद उर्फ सूरज जालिंधर पवार (वय २२, रा. काळज, ता. फलटण) यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडे लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार पृथ्वीराज युरोपियन शिंदे (वय २५, रा. ठाकुरकी, ता. फलटण), चिलम्या उर्फ संदीप महावीर उर्फ माळव्या शिंदे (वय २२, रा.सुरवडी, ता. फलटण) व इतर तीन साथीदारांसह केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वरील तीन आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी घेतली. तसेच तो गुन्हा सहा जणांनी केला असल्याचे तपासामध्ये या गुन्ह्यास वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
पोलीस कोठडीत वरील आरोपींकडून लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ४६,२०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले. तसेच आणखी २० गुन्ह्यातील एकूण ६४ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३६ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींकडून एक दरोडा, एक जबरी चोरी व १९ घरफोडीचे गुन्हे असे एकूण मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, इतर चोर्या असे एकूण ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी १५३ तोळे सोने (१.५ किलो) असा एकूण १,३३,७६,८३०/- (१ कोटी ३३ लाख ७६ हजार ८३० रुपये) रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.