अजिंक्यताऱयाच्या साक्षीने रेकॉर्ड अजिंक्य, डॉ. संदीप काटे यांचा संकल्प पूर्ण, तब्बल 12 वेळा गड चढाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा , दि.९ : पहाटे उगवत्या सुर्याला साक्षी ठेवून किल्ले अजिंक्यताऱयाच्या पायथ्याला जागतिक विक्रमाची सुरुवात जयभवानी जय शिवाजीच्या जयघोषाने झाली. मशाल पेटवून किल्ले अजिंक्यताऱयाची मोहिमेवर डॉ. संदीप काटे यांच्यासह सातारा रनर्स ग्रुपचे सभासद धावायला लागले. सायंकाळी साडे पाच वाजता किल्ले अजिंक्यताराच्या साक्षीनेच अजिंक्य असा जागतिक विक्रम डॉ. संदीप काटे, सोमनाथ राऊत, संतोष कोकरे, राजेंद्र शेळके यांनी केला.

दरम्यान, केवळ विक्रम करुन ही मंडळी थांबली नाही तर मंगळाई देवीच्या साक्षीने दुर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱया 25 संस्थांचा सन्मान सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमामुळे मंगळाई देवी मंदिराचा परिसराला एक वेगळेच स्वरुप आले होते.  सातारा हिल मॅरेथॉनचे डॉ. संदीप काटे यांनी लॉकडाऊन काळात किल्ले अजिंक्यतारा चढाई, उतराई मोहिम तब्बल 12 वेळा सलग करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी रविवारी पहाटेच्या सुमारास खालच्या मंगळाई मंदिरात सातारा रनर्सस ग्रुपच्यावतीने क्रांतीचे प्रतिक असलेल्या मशाल पेटवून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पत्रकार राजेश सोळसकर, राजेश निंबाळकर यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात झाली. डॉ. संदीप काटे हे स्वतः धावत सहभागी झालेल्यांनाही धावताना प्रोत्साहन देत होते. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत धावत होते. त्यांच्यासोबत सोमनाथ राऊत, संजय ढाणे हे साताऱयाचे तर लोणंदचे संतोष कोकरे, राजेंद्र शेळके, प्रशांत पवार, प्रा. कलमसिंह क्षत्रिय यांच्यासह धावपट्टू पळत होते.

या सर्व धावपट्टूंचा धावण्याचा मार्ग हा पाऊलवाट होती. किल्ले अजिंक्यताऱयाच्या झाडीतल्या पाखरांची किलबिलाट त्यांना धावायला प्रोत्साहित करत होती. उन्हामध्येही त्यांचा धावण्याचा वेग मंदावला नव्हता. सायंकाळी 5 वाजता दक्षिण दरवाजातून मुख्य दरवाजात पोहचल्यानंतर तेथे संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद डॉ. संदीप काटे यांच्या चेहऱयावर होता. गड उतरुन आल्यानंतर मंगळाई देवीच्या परिसरात सर्व धावपट्टूंचे स्वागत टाळयाच्या गजरात व जयघोषात करण्यात आले. या मोहिमेत डोंगर ग्रुपच्या दहा वर्षाच्या साईराज कोकरे याने नॉनस्टॉप अजिंक्यतारा या मोहिमेत सकाळी सहभाग घेतला. तब्बल तीन फेऱया त्याने पूर्ण केल्या. त्याच्या या धाडसाबाबत त्याचा ही सन्मान करण्यात आला.

गडसंवर्धनाचे कार्य करणाऱयांचा सन्मान
किल्ले अजिंक्यताऱयावर गडसंवर्धनासाठी सातारकर तनमनधन अर्पण झटत आहेत. त्यांचे यथोचित सन्मानपत्र देवून सातारा रनर्स ग्रुपकडून सन्मान करण्यात आला. यामध्ये अजिंक्यतारा श्रमदान ग्रुप, हरिओम रत्नेश्वर ग्रुप, हरिओम किल्ला ग्रुप, सप्तर्श्री मंदिर ग्रुप, मंगळाई देवी नवरात्रोतसव मंडळ, मंगलमूर्ती ग्रुप, उत्तराभिमुखी मंदिर सेवक ग्रुप, सातारा शिवराज्यभिषेक उत्सव समिती, प्रशांत आहेरराव मित्र समुह, जायट्सं ग्रुप ऑफ सातारा, धर्मवीर युवा मंच, शिवस्वराज्य प्रतिष्ठान गार्डनर्स ग्रुप, धर्मरक्षक राजधानी ग्रुप यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. संदीप काटे यांच्या जागतिक विक्रमाचे कौतुक
डॉ. संदीप काटे यांनी 7 फेब्रुवारीला केलेल्या जागतिक विक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, रत्नेश्वरग्रुपचे राजूशेठ राजपुरोहित, माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, अभिजीत बर्गे, अमोल खोपडे, अमित काकडे, तनमनधनचे अक्षय शिंदे, अभि सुर्वे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातारा रनर्स ग्रुपचे सभासद प्रयत्न करत होते.

डॉ. संदीप काटे अजिंक्यच
तब्बल 12 वेळा नॉनस्टॉप अजिंक्यताऱयावर चढून उतरण्याची मोहिम फत्ते करुनही डॉ. संदीप काटे हसतमुखाने प्रत्येकाचे स्वागत करत होते. जागतिक विक्रम करुन अजिंक्य राहिलेल्या डॉ. काटे यांनी स्वतःचा विक्रम विसरुन गड संवर्धनासाठी काम करणाऱयांचा गौरव केला. यावेळी नुसतेच डोंगरातून पळायचे यात लय मज्जा नाही. तर खरी प्रेरणा मिळते ती जी मंडळी या किल्यासाठी या गडासाठी काम करतात. गडावर झाडे लावतात. त्यांना पाणी घालतात. गडावर स्वच्छता करतात. गडाच्या संवर्धनाचे कार्य करतात. त्यांचा सन्मान करुन त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले पाहिजे. खूप दिवसांनी किल्यावर गेलो तेव्हा काम पाहिले. गडावरील बदल पाहिला. तुमच्या श्रमाला सलाम, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!