
स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ‘मनोमिलन’ चर्चेच्या पार्श्वभूमीवर, राजे गटाचे कट्टर समर्थक संग्राम अहिवळे यांनी एक सडेतोड राजकीय विश्लेषण प्रसिद्धीस दिले आहे. “खरं तर मनोमिलन लोकसभेलाच व्हायला हवे होते, पण खासदार गटातील काही ‘विघ्नसंतोषी’ कार्यकर्त्यांमुळे ते झाले नाही. परिणामी, फलटण तालुक्याला मिळणारे संभाव्य केंद्रातील मंत्रिपद गेले आणि नेता घरी बसला,” असा घणाघात अहिवळे यांनी केला आहे.
खासदार गटाच्या कार्यकर्त्यांवर स्वार्थाचा आरोप करत अहिवळे यांनी म्हटले आहे की, “या कार्यकर्त्यांनी स्वतःला किंमत मिळावी आणि आपली पोळी भाजता यावी, यासाठी नेत्याच्या हिताची भूमिका घेऊ दिली नाही. माळशिरसमध्ये टोकाची भांडणे मिटवून एकाला आमदारकी व एकाला खासदारकी मिळाली, तसे फलटणमध्ये होऊ शकले नाही, कारण येथील कार्यकर्ता स्वतःच्या स्वार्थासाठी ते होऊ देणार नाही.”
“आमचं राजे गटाचं काहीही गेलेलं नाही, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आजही विधान परिषद सदस्य आहेत. पण विरोधी गटाचे काय? कार्यकर्ता आमदार झाला (अजित पवारांमुळे), पण नेता घरी बसला (कार्यकर्त्यांमुळे),” असा टोलाही त्यांनी लगावला.
अहिवळे यांनी असाही आरोप केला की, खासदार गटाच्या नेत्याच्या मनात नसतानाही, या विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांनीच नेत्याच्या आडून राजे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलीस स्टेशन व इतर माध्यमातून वैयक्तिक कुरघोड्या केल्या. त्यामुळे तालुक्याच्या हितासाठी होणाऱ्या कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नेत्यांचे व तालुक्याचे नुकसान करू नये, असे आवाहनही संग्राम अहिवळे यांनी केले आहे.