स्थैर्य, कोरेगाव, दि. 01 : क्षुल्लक कारणांमुळे विकोपाकडे गेलेल्या सातारारोड येथील अगोदर मुस्लिम आणि आता हिंदू मुस्लिम समाजातील काही वाद कोरेगाव चे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे मिटला आहे. यातून नाहक समाजाबरोबर गावाची बदनामी वाढू लागल्याने कोरेगाव पोलिसांनी दोन्ही समाजाच्या प्रमुख व्यक्तीची एकत्रित बैठक घेऊन समेट घडवून आणला. गेली काही महिने असलेला तणाव अखेर निवळण्याच्या टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान सातारारोड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी विनाकारण दाखल केलेले गुन्हे माघारी घेण्याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दोन्ही समाजाबरोबर पोलीसांनी या प्रकरणावर समेट घडवून आणण्याच्या हालचाली सुरु केल्या. अखेर हा समेट घडणार असल्याने सातारा रोड येथे हिंदू मुस्लिम ऐक्य, सलोखा समोर येणार आहे.
हिंदू-मुस्लिम दोन शेजारी कुटुंबात वाद झाला होता. तो वाढू नये,अन्यथा कुणीतरी भानगडी करून चुकीच्या मार्गाचे अनुकरण केल्यास तेथे व्यापार ठप्प होऊन त्याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागतात.एकमेकांना समजून घ्या आणि गुण्यागोविंदाने रहा,असे आवाहन या बैठकीत कोरेगावचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे. कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम समाजात दरी वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे आवारात हिंदू-मुस्लिम शांतता व सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोडसे यांनी मार्गदर्शन केले.
गावातील काही कुटुंबांनी सपोनि संतोष साळुंखे यांच्या हेकेखोर स्वभाव आणि असाह्य नाहक त्रासाबद्दल पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतर गावातील अन्य विरोधकांनी साळुंखे यांना सपोर्ट करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली.दोन्ही गट एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी अंतर्गत कुरघोडय़ा सुरु केल्याने हा संघर्ष घातक ठरण्याच्या वळणावर पोहचला. त्यातच साळुंखे यांच्या विरोधात थेट एसपी यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने त्याचीही चौकशी होणार होती. मात्र वेळीच पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी हस्तक्षेप करून समेट घडवून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहेत. यावेळी वाद झालेल्या दोन्ही कुटूंबियांना एकत्र करून त्यांचे गैरसमज दूर केले जातील. याला कुणीही हिंदू- मुस्लिम भांडणाचा रंग न देता सलोखा निर्माण होणे गरजेचे आहे. यावेळी सर्वांनी भविष्यात याविषयी कोणताही तेढ निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करण्यास आश्वासन प्रतिसाद दिला. योग्य पोलिसिंग राबवल्यास चांगल्या गोष्टी घडू शकतात याचा अनुभव पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्यामुळे सातारारोडवासियांना अनुभवास मिळाला.