दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2025 | सातारा | सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवर नुकतीच “राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025” असे शिर्षक देत कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसारित झाली आहे, यामुळे अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन या संबंधित माहिती विचारणा करू लागले आहेत. मात्र, या जाहिरातीशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोणताही संबंध नाही, हे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर प्रसारित होणारी ही जाहिरात पूर्णपणे खोटी आहे आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी अशा प्रकारची कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसारित केलेली नाही, हे त्यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी या खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवून कोणतीही कार्यवाही करू नये, असा स्पष्ट संदेश दिला आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा फसव्या जाहिरातींमुळे नागरिकांची आर्थिक, शारिरिक व मानसिक नुकसान होऊ शकते, याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.