स्थैर्य, फलटण : दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, शेजारी नायब तहसीलदार विजय चांदगुडे, अनिल ठोंबरे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, दुसऱ्या छायाचित्रात डॉ. शिवाजीराव जगताप यांचे स्वागत व सत्कार करताना आर. सी. पाटील.
स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेली एकजुट, आपुलकी व प्रेम भावनेमुळे महसूल खात्याकडील नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामांची पूर्तता करुन सर्वांना दिलासा देण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सर्वांचे कौतुक करीत सर्वांना महसूल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
महसूल विभागांतर्गत दि. १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते, यावेळी प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, नायब तहसीलदार विजय चांदगुडे, महसूल नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल उपस्थित होते.
महसूल विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कामांचा आढावा घेताना लोकसभा व विधानसभा पंचवार्षिक निवडणूका, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, पंतप्रधान किसान विकास योजना, करोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रण व नियोजन वगैरे महसूल विभागाशिवाय अन्य कामांचा अतिरिक्त भार महसूल विभागावर पडला असताना अनेक पदे रिक्त असूनही सर्वांच्या एकजुटीमुळे सर्व कामे पार पाडून संबंधीतांना दिलासा देण्यात महसूल विभागाने मोठे यश प्राप्त केल्याचे नमूद करीत प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सर्वांचे कौतुक केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांनी प्रास्तविकात महसूल अधिनियम १९६६ दि. १ ऑगस्ट रोजी अस्तित्वात आला, त्याचप्रमाणे दि. १ ऑगस्ट ते दि. ३१ जुलै असे असणारे महसुली वर्ष दि. १ ऑगस्ट रोजी सुरु होत असल्याने प्रतिवर्षी दि. १ ऑगस्ट महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा केला जात असल्याचे निदर्शनास आणून देत महसूल विभागाच्या माध्यमातून फलटण तालुक्यात गेल्या वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा घेत त्यामध्ये सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
महसूल विभागांतर्गत सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतानाच विशेष कामगिरीबद्दल काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांपैकी पुरवठा शाखेने अन्नधान्य पुरवठ्यासाठी केलेल्या कामाबद्दल या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले, लोकसभा व विधानसभा निवडणूका व्यवस्थित पार पाडणे, ग्रामपंचायत निवडणूकांची प्रभाग रचना, गौणखनिज मधील विविध यशस्वी कारवाई, संजय गांधी योजनेतील प्रकरणे, एम आर ई जी एस अंतर्गत गेल्या वर्षभरात करण्यात आलेली कामे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे मार्ग यासाठी जमीन संपादन, महसुली वसूली, नुकसान भरपाई व जमीन संपादन मोबदला वितरण वगैरे कामे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.
दरम्यान सर्वत्र वाढत असलेल्या करोना आजार लक्षणे व उपाय योजना, सदर आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता याबाबत करोना नियंत्रण तालुकाधिकारी व गिरवी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी महसूल नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.