“राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार, पण…”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधणार असल्याचं वृत्त समोर येत आहे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२३ । मुंबई । गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणात अनेक घटना घडल्याचे दिसून आहे. यातच, आता सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.  सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यातच आता या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे खासगीत म्हटले असल्याची माहिती आहे. पत्रकारांशी अनपौचारिक बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी राज ठाकरेंना फोन करण्यास तयार आहे. वेळ आल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज ठाकरेंशी बोलणार. फोन उचलायला तयार असतील, तर फोन करणार.” बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणे संग्रहित केली जाणार आहे. यापैकी काही भाषणे ही राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्यावेळी ध्वनीमुद्रित केली होती. ही भाषणे राज ठाकरे यांच्याकडे असू शकतात. त्यामुळेच या भाषणांच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फोन उचलणार असेल तर त्याला फोन करतो, असे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत त्यांच्या मनात येते. जेव्हा २०१७ ला आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फोन उचलला नव्हता. आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी फोन उचलला जाणार नाही, असा विचार करु नये, असे संदीप देशपांडे म्हणाले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक चांगले व्हावे, म्हणून तुम्हाला ती भाषणं हवी आहेत. मग बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तुमचा इगो का मध्ये येत आहे? तू उचलणार असशील तर फोन करतो, हा इगो कशाला? बाळासाहेबांचे भाषण मोठे की तुमचा इगो ? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाने ज्यावेळी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचे म्हटले होते. तसेच, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा देखील पुन्हा जोर धरु लागल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीसंदर्भातील चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र, आता जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली, तर राजकारणात ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील पुढील राजकीय वाटचाल कशी असेल? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 


Back to top button
Don`t copy text!