दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । फलटण । आज मोबाईलच्या अतिवापरामुळे महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये पुस्तके व ग्रंथ वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसते. ग्रंथालयातील पुस्तके वाचकांची वाट पाहत आहेत परंतु ती पुस्तके घेऊन वाचणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे, अशी खंत मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी एच.कदम यांनी व्यक्त केली. मुधोजी महाविद्यालयाच्या श्रीमंत शिवाजी राजे नाईक निंबाळकर ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच.कदम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य कदम असे म्हणाले की आज विद्यार्थ्यांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळविण्याची व त्यांना ग्रंथ वाचण्यास प्रवृत्त करण्याची वेळ आलेली आहे. त्यादृष्टीने अशा प्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात किमान एक तरी आत्मचरित्र वाचावे. साहित्य आणि ग्रंथ वाचनाने आपण आपले जीवन हे नक्कीच समृद्ध करू शकतो. एका पुस्तकाच्या वाचनाने देखील आपल्या जीवनाला योग्य अशी दिशा मिळू शकते. ग्रंथ हे आपल्यावर अप्रत्यक्षपणे संस्कार करीत असतात. सुसंस्कृत भावी समाजाच्या निर्मितीसाठी साहित्य वाचन ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पाठ्यक्रमातील क्रमिक पुस्तकांबरोबरच ग्रंथालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य व श्रेष्ठ ग्रंथ वाचले पाहिजेत. महाविद्यालयातील या ग्रंथालयात एक लाखापेक्षाही जास्त ग्रंथसंपदा आहे. अशा समृद्ध ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी मनुष्य जीवनामध्ये पुस्तकांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये ग्रंथ वाचन किती महत्त्वाचे आहे याविषयी आपले मत मांडले. अनेक महापुरुषांची उदाहरणे देऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये ग्रंथांना, पुस्तके वाचनाला किती महत्व दिले होते हे सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून वाचनाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. आज ग्रंथालयातील कपाटामध्ये ठेवलेली पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी साद घालीत आहेत, विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद द्यावा हे उद्दिष्ट ठेवूनच या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा. आनंद पवार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. नवनाथ रासकर, प्रा. डॉ. नितीन धवडे, प्रा. मदन पाडवी, व इतर प्राध्यापक वृंद तसेच सहाय्यक ग्रंथपाल श्री अमरसिंह घोरपडे, श्री संजय पंडीत, सौ. आशालता बनकर, सौ. रजनी मदने, श्री रोहित दुधाळ, श्री बबन कोळेकर, श्री सुनील आवटे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी वाचनीय अशा आत्मचरित्रांचा, चरित्रांचा, प्रसिद्ध अशा साहित्यिक कलाकृतींचा समावेश करण्यात आला होता. या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.