दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक रमेश बोबडे यांनी प्रास्ताविक करून डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून आपण काय केले पाहिजे हे सांगितले.
ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून एक हजार रुपये किंमतीची वाचनीय पुस्तके मोफत भेट दिली.
मुख्याध्यापिका सौ विद्या शिंदे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगून, वाचाल तर वाचाल याविषयी माहिती दिली तसेच जीवनात पुस्तकांचे किती महत्व आहे हे समजून सांगितले. उपशिक्षक श्री ताराचंद्र आवळे यांनी भेट दिलेल्या पुस्तकाबद्दल समाधान व्यक्त केले.
सुरुवातीला डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी हात धुवा या दिनाचे औचित्य साधून उपशिक्षिका सौ. गौरी जगदाळे यांनी हात व्यवस्थित धुण्याचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे वैयक्तिक व सामूहिक प्रात्यक्षिक करून घेतले.
विद्यार्थ्यांनी व्यवहारात पारंगत व्हावे म्हणुन शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी आणलेले विविध खाण्याचे पदार्थ, भाजीपाला, फळे,धान्य, झाडांची रोपे,किराणा, सौंदर्य प्रसाधने याचे स्टॉल उभारून बाजार भरविण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक व ग्रामस्थ यांनी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली.
उपशिक्षिका सौ पौर्णिमा जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी श्री प्रदीप माने, सौ सोनवलकर ए.ए.,सौ बनकर एस. एस. श्री सोळंकी ए.आर.,श्री राजेंद्र घाडगे,श्री गजानन धर्माधिकारी,पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.