स्थैर्य, फलटण : जून 2020 या महिन्यातील सर्वात जास्त 27 पुस्तक वाचून समीक्षण केल्याबद्दल, गणेश तांबे यांचा वाचनसाखळी समूहाकडून गौरव करण्यात आला आहे. गणेश तांबे प्राथमिक शिक्षक असून ते नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. वाचन साखळी बद्दल गणेश तांबे म्हणाले की, 1 मे 2020 पासून सुरु केलेला वाचनसाखळी हा उपक्रम सदस्य संख्या 2300 वर गेली आहे. वाचन साखळी हा उपक्रम खरोखरच एक आगळा वेगळा असा फेसबुक वरिल उपक्रम आदरणीय प्रतिभाताई लोखंडे व प्रतिभा टेमकर मॅडम यांच्या कल्पनेतून सुचलेला असा हा आगळावेगळा उपक्रम असून दोघी शिक्षिका, दोघींच्या नावातच प्रतिभा हा शब्द खराखुरा प्रतिभावंत वाटतो. महिलांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम एक प्रेरणादायी उदाहरण आपणास डोळ्यासमोर दिसून येते. खरोखरच वाचन साखळी महाराष्ट्राच्या काना-कोपर्यातच नव्हे तर इतर ठिकाणीही अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीला उतरलेला हा एक आगळा वेगळा उपक्रम असेल, दोन्ही महिला भगिनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे करावं तितकं कौतुक कमीच आहे.
पुस्तक वाचण्याने मस्तक सुधारते, सुधारलेलं मस्तक कोणाचं हस्तक तर होतच नाही. पण लाचारीने कोणापुढे नतमस्तक होत नाही. पुस्तकाची संगतच खरी वाढवते आयुष्याची रंगत. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले संस्कार, चांगले विचार पुस्तकातून मिळत असतात. प्रत्येकाच्या घराघरात ग्रंथालय हीच देवालय व्हावेत आणि ग्रंथ हेच देव. नव्या पिढीच्या नावे बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा त्यांना संस्काराच्या ठेवी देणाऱ्या पुस्तकांच्या बँका उभारणं ही आज काळाची गरज आहे. वाचनसाखळी या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून नवनवीन पुस्तकांची माहिती मिळते. लेखकांची ओळख होते. शब्द भंडारात वाढ होऊन विचार आचार करण्याची उंची वाढते. आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना होतो. वाचन असल्याने मन व शरीर तंदुरुस्त राहते. असेही गणेश तांबे यांनी स्पष्ट केले.