स्थैर्य,अमरावती,दि.22 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक व्यापकतेने होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मायग्रंट सपोर्ट सेंटरचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक कपिल बेंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, माविमचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्थलांतरित गरजू, शहरी गरीब लोकांना रोजगार मिळवून देणे, त्यांचे एकाच स्त्रोतावरील अवलंबन कमी करणे व पुन्हा स्थलांतराचा धोका कमी करण्यासाठी स्थानिकस्तरावर रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी सपोर्ट सेंटर सुरु करण्यात आले आहे. माविमतर्फे बचत गटांच्या नेटवर्किंगमधूनही अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, हे काम अधिक व्यापक व भक्कम स्वरूपात उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी गावोगाव व तळागाळापासून पोहोचून गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महामंडळाच्या कोविड जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून तो मार्गस्थ करण्यात आला. अमरावतीसह अचलपूर येथेही हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. 6 हजारपेक्षा अधिक स्थलांतरितांसाठी जागरूकता अभियान राबविण्यात आले. 352 युवक-युवतींना ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण, 162 व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र व बँकांची मदत मिळवून देण्यात आली. सपोर्ट सेंटर प्राधान्याने स्थलांतरितांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करेल, अशी माहिती श्री. सोसे यांनी दिली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महामंडळाच्या विविध पुस्तिकांचेही प्रकाशन करण्यात आले.
महामंडळाच्या उपक्रमांच्या लाभ मिळालेल्या लक्ष्मी वानखडे, दिनेश व्यास, निर्मला खवस, दिनेश वारंग, सबीना परवीन आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.