वं‍चित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा – समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । सातारा । सामाजिक न्याय पर्वाचा उद्देश वंचित व दुर्बल घटकांना न्याय देणे असून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात मिडीया सेंटर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज नागपूर येथे दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य सामाजिक न्याय विभागातर्फे १ एप्रिल ते १ मे २०२३ पर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत समाज कल्याण कार्यालयात आज तृतीयपंथीयांना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड, आरोग्य शिबीर, ई-श्रम कार्ड, संजय गांधी निराधार योजना, तृतीयपंथी ओळखपत्र देण्यासाठी  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन डॉ. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्षक गाडीलवार, सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी तसेच आनंद चंद्रानी, राणी ढवळे व तृतीयपंथी नागरिक यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या जवळपास ३०० असून या सर्वांना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी सर्व प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

समाजकल्याण उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड व सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली.

विशाखा गणोकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. अंजली चिवंडे यांनी आभार मानले.

याप्रसंगी कल्याणी श्री. गुरु नायक, शहनाज गुरु, जरीना दादी, रेश्मा गुरु, केशतो दादी, राणी ढवळे, आनंद चंद्रानी, निकुंज जोशी, तनुजा फाले व मनोज राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!